मुक्ता-मीरा यांची नवी भरारी! ‘पुन्हा नक्की भेटू’ नाटकाचा २३ ऑक्टोबरला शुभारंभ 
मनोरंजन

मुक्ता-मीरा यांची नवी भरारी! ‘पुन्हा नक्की भेटू’ नाटकाचा २३ ऑक्टोबरला शुभारंभ

पंचवीस वर्षांच्या मैत्रीचा धागा जपत अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर आता नाट्यनिर्मितीच्या नव्या प्रवासासाठी एकत्र आल्या आहेत.

Swapnil S

पंचवीस वर्षांच्या मैत्रीचा धागा जपत अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि मीरा वेलणकर आता नाट्यनिर्मितीच्या नव्या प्रवासासाठी एकत्र आल्या आहेत. ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाच्या निमित्ताने या दोघी पहिल्यांदाच निर्मात्या म्हणून एकत्र येत आहेत. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे. या निमित्ताने ‘रंगमाया’ या नव्या नाट्यसंस्थेचीही सुरुवात होत आहे.

अभिनय, दिग्दर्शन आणि जाहिरात क्षेत्रातील अनुभव असलेल्या मीरा वेलणकर यांचे नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातील हे पहिले पाऊल आहे. विशेष म्हणजे, या नाटकाची संहिता मुक्ताला तिच्याच भावाच्या लेखणीतून साकारलेली मिळाली. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या देबू बर्वे यांनी नाटकाचे लेखन केले आहे. मीरा वेलणकर यांनी दिग्दर्शन केले असून, ‘रंगमाया’ आणि ‘अष्टविनायक’ या संस्थांनी नाटकाची निर्मिती केली आहे. मुक्ता बर्वे, मीरा वेलणकर आणि दिलीप जाधव हे या नाटकाचे निर्माते आहेत.

या नाटकात मुक्ता बर्वे यांच्यासोबत प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे आणि आरती वडगबाळकर यांच्या भूमिका आहेत. प्रदीप मुळ्ये यांनी नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची, तर श्रीनाथ म्हात्रे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. या नव्या प्रवासाविषयी मुक्ता बर्वे म्हणाल्या, “मैत्रीण म्हणून मीरा उत्तम आहेच; पण दिग्दर्शिका म्हणून तिच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी समृद्ध करणारा अनुभव आहे. तिची कलात्मक दृष्टी आणि संवेदनशीलता तालमीदरम्यान प्रकर्षाने जाणवली. मीराच्या दिग्दर्शनातून मला ही साथ मिळाली आहे.

दिग्दर्शिका मीरा वेलणकर यांनीही या सहप्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. “कोणतेही काम सुंदर होण्यासाठी परस्परांवरील विश्वास आणि एकमेकांची साथ महत्त्वाची असते. मुक्ता आणि दिलीप जाधव यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास खास आहे. यावेळी निर्माते म्हणून एकत्र काम करण्याचा अनुभव वेगळा होता. आमच्यातील समन्वय आणि एकमेकांना दिलेली साथ यामुळे नाटकाची निर्मिती करताना आनंद मिळाला. हाच आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शुभारंभाचे प्रयोग

‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाचे प्रयोग २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे होणार आहेत. २४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे; २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे प्रयोग होईल. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे दुपारी ३.३० वाजता, १० नोव्हेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे रात्री ८.३० वाजता, ११ नोव्हेंबर रोजी आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे दुपारी ४ वाजता आणि १३ नोव्हेंबर रोजी कालिदास नाट्य मंदिर, मुलुंड येथे दुपारी ४.३० वाजता प्रयोग होणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मसाल्यात भेसळ केल्यास ७ वर्षे शिक्षा, १० लाख दंड; FDA ची नवी नियमावली जारी

रायगड जिल्ह्यात भात पीक संकटात; लागवडीचे क्षेत्र घटले, दरवाढीची चिन्हे

दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द

१ नोव्हेंबरपासून फोन करणाऱ्याचे नाव दिसणार; दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय

ही तर ‘सेटिंग’च - अभिजीत दिपके