Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल 
मनोरंजन

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर गोव्यातील त्यांच्या शेवटच्या सार्वजनिक कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कार्यक्रमात त्यांनी तालवाद्य वाजवत कलाकारांसोबत नृत्य केले आणि आयुष्य-मृत्यूबाबत भावूक विचार मांडले.

Mayuri Gawade

नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, निधनापूर्वी काही दिवस आधी गोव्यातील एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या नाना पाटेकरांचा व्हिडीओ समोर आला आहे. या कार्यक्रमात त्यांनी कलाकारांसोबत संवाद साधला, त्यांच्या सादरीकरणाला दाद दिली, तबला वाजवला आणि कलाकारांसोबत नृत्याचाही आनंद घेतला. याच समारंभात नाना पाटेकर यांनी उपस्थितांना संबोधितही केलं होतं. मात्र, त्यावेळी त्यांच्या तोंडून निघालेले काही शब्द पुढे त्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेत येतील, याची कुणालाही कल्पना नव्हती. भाषणादरम्यान ‘उद्या मी इथे असेन की नाही, हे मला माहीत नाही’, असं नाना पाटेकर यांनी म्हटलं होतं. आता त्यांच्या या शेवटच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सार्वजनिक कार्यक्रमाला लावली होती हजेरी

नाना पाटेकर यांनी गेल्या रविवारी, ४ ऑक्टोबर रोजी गोव्यातील डोना पावला येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विविध कलाकारांचे सादरीकरण पाहिले. कलाकारांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या कलेचे कौतुकही केले.

तबला वाजवला, कलाकारांसोबत नाचले

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर तबला वाजवताना दिसत आहेत. तसेच त्यांनी कलाकारांसोबत नृत्य करत कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमात त्यांचा उत्साह आणि कलाकारांशी असलेला सहज संवादही पाहायला मिळतो. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. PTI ने हा व्हिडीओ नाना पाटेकर यांच्या शेवटच्या सार्वजनिक कार्यक्रमातील दृश्ये म्हणून शेअर केला आहे.

शेवटच्या भाषणात मनोहर पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा

याच कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी उपस्थितांना संबोधितही केले होते. या भाषणात त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि आपले जवळचे मित्र मनोहर पर्रीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. पर्रीकर यांच्याबद्दल बोलताना त्यांनी त्यांच्या कार्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला. पर्रीकर यांनी कमी वयात मोठे कार्य केले आणि ध्येयाने प्रेरित होऊन काम केले, असा उल्लेख नाना पाटेकर यांनी केला. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द आणि ध्यास असलेल्या व्यक्तींचे महत्त्वही त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

‘प्रत्येकाला जायचं आहे...’

नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणात मृत्यू आणि आयुष्याबाबतही भाष्य केलं होतं. ते म्हणाले, “जायचं आहेच. मीही आज आहे, उद्या नसेन. प्रत्येकाला जायचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक काळ येणारच. पण मृत्यूपूर्वी मला जे करायचं आहे, ते मी करू शकतो का? मी प्रयत्न केले का?”

पुढे ते म्हणाले, “माझं जग फक्त माझी मुलं, माझं घर, माझी बायको यापुरतंच मर्यादित असेल, तर माझ्या जगण्याचा उद्देश काय? मग जगा आणि मरा...” आयुष्य केवळ स्वतःपुरतं मर्यादित न ठेवता काहीतरी ध्येय घेऊन जगण्याची गरज असल्याचा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या या शेवटच्या सार्वजनिक कार्यक्रमातील व्हिडीओला आणि भाषणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काही दिवसांपूर्वीच उत्साहात कलाकारांसोबत सहभागी झालेले नाना आणि त्यांचे आयुष्य, काम तसेच मृत्यूबाबतचे विचार आता चाहत्यांच्या आठवणीत राहणार आहेत.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम

ऐन सणासुदीत घरांच्या विक्रीवर विपरित परिणाम होणार; RBI च्या निर्णयाने गृहकर्जाचे दर वाढणार असल्याने विकासकांना भीती

मुंबईतील फळे, भाज्यांवर केली जातेय रासायनिक प्रक्रिया? १० पैकी ६ कुटुंबांना येते शंका; सर्वेक्षणातून समोर आले वास्तव

Mumbai : ...तर महापौरांविरोधात वॉरंट जारी करू! न्यायालयाचा इशारा