टेलिव्हिजनच्या पडद्यावर आपल्या निरागसतेने प्रेक्षकांची मने जिंकणारा बालकलाकार वीर शर्माचा आगीत गुदमरून मृत्यू झाला. तसेच, त्याचा मोठा भाऊ शौर्य शर्मा याचेही दुर्दैवी निधन झाले. शनिवारी (दि. २७) रात्री राजस्थानमधील कोट्यातील त्यांचा घराला आग लागली. या आगीत गुदमरून दोन्ही भावांनी अगदी लहान वयातच जीव सोडला. वीर हा १० वर्षांचा होता तर शौर्याचे वय १५ वर्ष होते.
ही घटना कोट्यातील अनंतपुरा भागातील दीप श्री बहुमजली इमारतीत घडली. रात्री उशिरा लागलेल्या आगीत दोन्ही मुले चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एकटीच होती. झोपेत असतानाच अचानक धूर पसरल्याने ते दोघेही गुदमरले. शेजाऱ्यांनी धूर निघताना पाहून दरवाजा तोडून मुलांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शॉर्ट सर्किटमुळे आग
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समोर आले. पोलिस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, "ड्रॉइंग रूम पूर्णपणे जळून खाक झाला असून फ्लॅटच्या उर्वरित भागातही जळण्याच्या खुणा दिसून येतात." स्थानिक ठाण्याचे प्रभारी भूपेंद्र सिंह यांनीही विद्युत बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले.
वीर आणि शौर्यची आई रीता शर्मा अभिनेत्री असून वडील जितेंद्र शर्मा कोट्यातील एका खाजगी कोचिंग संस्थेत कार्यरत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंब आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आगामी चित्रपटात 'सैफ'ची भूमिका
वीरने लोकप्रिय पौराणिक मालिकेत 'वीर हनुमान'मध्ये लक्ष्मणच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले. केवळ १० व्या वर्षी त्याने अभिनयात आपली वेगळी छाप सोडली. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, वीरला आगामी चित्रपटात सैफ अली खानच्या बालपणाची भूमिका साकारण्यासाठी निवडले गेले होते. त्यासाठी तो २ ऑक्टोबर रोजी मुंबईत परतणार होता. परंतु, या आगीत त्याचे स्वप्न अधुरेच राहिले.