मुंबई : रॅश ड्रायव्हिंगचा आरोप करून एका जमावाने सिनेअभिनेत्री रवीना टंडनसह तिच्या कारचालकाला मारहाण केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार समोर आला असून याप्रकरणी खार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुसरीकडे कारचालकाने रॅश ड्रायव्हिंग केले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले आहे.
शनिवारी रात्री काही महिला लग्नाच्या कार्यक्रमावरून घरी जात होत्या. खारच्या कार्टर रोडवरून जात असताना तिथे रवीना टंडनची कार आली. तिच्यासोबत तिचा कारचालक होता. कार मागे घेताना कारचालकाने या महिलेच्या अंगावर कार नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करून या महिलांनी कारसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान रवीना टंडन ही कारमधून उतरली आणि तिने या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रागाच्या भरात त्यांनी रवीनासह तिच्या कारचालकावर धक्काबुक्की करून हल्ला केला. तिने त्यांना मारहाण करू नका, असे सांगण्याचा प्रयत्न केला.
दुसरीकडे काहीजण त्यांच्या मोबाईलवरून चित्रीकरण करत होते. त्याचाच एक व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. या वादानंतर संबंधित प्रकरण खार पोलीस ठाण्यात गेले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. यावेळी या महिलांनी केलेले सर्व आरोप बोगस असल्याचे उघडकीस आले. पोलीस ठाण्यात दोघांच्या वतीने प्रकरण मिटल्याचे सांगण्यात आले. कोणीही तक्रार न केल्यानंतर पोलिसांनी सर्वांना घरी जाण्याचा सल्ला दिला. या घटनेबाबत रवीना टंडनकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले नाही. मात्र, खार पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे.