दक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून समांथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत होती. दोघांचे एकत्र फोटो आणि त्यांच्यातील जवळीक पाहून चाहत्यांमध्ये या नात्याबाबत बरीच कुजबूज सुरू होती.
कोयंबटूरमध्ये अतिशय खास विवाहसोहळा
१ डिसेंबरला या सर्व चर्चांना पूर्णविराम देत समांथा आणि राज यांनी कोयंबटूरच्या लिंग भैरवी मंदिरात पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. अगदी जवळचे नातेवाईक आणि निवडक पाहुणे यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.
समंथाचा लाल पारंपरिक साडीतला नववधू लूक आणि राजसोबतचे ब्लर फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
एक्स-पत्नी श्यामली डेची पोस्ट चर्चेत
या विवाहसोहळ्यानंतर चर्चेचा आणखी एक मुद्दा ठरला तो म्हणजे, राज निदिमोरू यांच्या एक्स-पत्नी श्यामली डेची इंस्टाग्राम स्टोरी.
तिनं नाव न घेता फक्त एक संकेतपूर्ण वाक्य शेअर केलं- "काही उतावीळ लोक उतावीळ गोष्टी करतात." तिची ही स्टोरी नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय ठरला असून, अनेकांनी ते विवाहाशी जोडत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत.
समांथाचा दुसरा विवाह
समंथाच्या आयुष्यातील हा दुसरा विवाह आहे. याआधी तिचं अभिनेता नागा चैतन्यासोबत लग्न झालं होतं; मात्र २०२१ मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
घटस्फोटानंतर समंथानं मायोसिटिससारख्या आजाराशी लढा देत स्वतःला सावरलं आणि पुन्हा कामावर लक्ष केंद्रित केलं. तर नागा चैतन्य सध्या शोभिता धुलिपालासोबत वैवाहिक जीवन जगत असल्याचीही चर्चा आहे.
‘फॅमिली मॅन २’पासून सुरू झालेली जवळीक
समंथा आणि राजची जवळीक ‘द फॅमिली मॅन २’च्या शूटदरम्यान वाढली. त्यानंतर दोघांनी ‘सिटाडेल: हनी बनी’ प्रोजेक्टवरही एकत्र काम केलं. लवकरच समांथा, राज–डीके यांच्या आगामी वेबसीरिज 'रक्त ब्रह्मांड'मध्ये झळकणार आहे.
चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
समांथा-राजच्या लग्नाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे.