मनोरंजन

शिवानी सोनारचे मालिकाविश्वात पुनरागमन; ‘तारिणी’त साकारणार सशक्त भूमिका

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी शिवानी सोनार आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परततेय. पण यावेळी तिच्या भूमिकेचा आवाका अधिक खोल, अधिक संघर्षमय आहे.

Mayuri Gawade

‘राजा राणीची गं जोडी’ मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी शिवानी सोनार आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परततेय. पण यावेळी तिच्या भूमिकेचा आवाका अधिक खोल, अधिक संघर्षमय आहे. झी मराठीवरील 'तारिणी' या नव्या मालिकेत ती एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारतेय. पण केवळ गणवेशातली नाही, तर अंतर्बाह्य लढणारी एक सशक्त तरुणी.

शिवानीचं करिअर पाहिलं, तर ती कायमच वेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा निवडताना दिसली आहे. तिच्या अभिनयातली सहजता, डोळ्यांतलं बोलकं भावविश्व आणि संवादातली सहज ताकद, हेच तिचं वेगळेपण आहे.

‘तारिणी’ मालिकेत शिवानी 'तारिणी बेलसरे' ही भूमिका साकारत आहे. ही भूमिका एका अशा मुलीची आहे जिने आपल्या आईवर लागलेल्या खोट्या आरोपांमुळे पोलिस खात्यात पाऊल ठेवलंय.

या प्रवासात तिच्यासोबत असलेला तिचा मित्र केदार- हुशार, शांत, अचूक निशाणा लावणारा तरुण. तो देखील त्याला आणि त्याच्या आईला सोडून गेलेल्या वडिलांचा शोध घेत असतो . जसं तारिणी तिच्या आईच्या मृत्यूमागचं सत्य शोधतेय, तसं केदारही आपल्या आयुष्यातल्या उणेपणाला उत्तर शोधतोय. या प्रवासात ते दोघंही एकमेकांचे आधार बनतात.

कथा पुढे सरकत असतानाच, एक वळण येतं जेव्हा, मिडिया टायकून खांडेकरांच्या घरात तारिणी आणि केदार राहू लागतात. काय असं घडलं असेल की त्यांना खांडेकरांच्या घरात प्रवेश करावा लागतो. तारिणीने खांडेकरांच्या घरात शिरण्यामागचे काय असेल कारण? खांडेकरांच्या घरात तारिणीच्या आईच्या गुन्हेगाराचे धागेदोर सापडणार का?? ज्यामुळे तारिणी आणि केदार मध्ये दुरावा येईल? अशा प्रश्नासोबत मालिका सुरू राहते.

‘तारिणी’चा प्रोमो समोर आल्यानंतर चाहत्यांच्या कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडतोय. "कडक, हेच हवं होतं" पासून ते "शिवानी पुन्हा एकदा छाप सोडणार" अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

११ ऑगस्टपासून झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या निमित्ताने शिवानी पुन्हा एकदा नायिकेच्या नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येतेय. पण यावेळी तिच्या डोळ्यांत केवळ प्रेम नाही, तर प्रचंड राग, वेदना आणि सत्य शोधण्याची धग दिसतेय!

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत