मनोरंजन

"स्टाफला दोष देऊ नका"; IndiGo फ्लाइट रद्दप्रकरणी सोनू सूदचे नागरिकांना शांततेचे आवाहन

देशभरात इंडिगोच्या अनेक उड्डाणांना विलंब व रद्दीकरणाचा फटका बसल्यानंतर हजारो प्रवासी विमानतळावर अडकले होते. तांत्रिक अडचणी, हवामान आणि नवीन क्रू-रोस्टर नियमांमुळे उड्डाण वेळापत्रक कोलमडले. अशा वेळी सोनू सूदने प्रवाशांना शांत राहण्याचे आणि इंडिगोच्या ग्राउंड स्टाफवर राग काढू नये असे आवाहन केले आहे.

Mayuri Gawade

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद नेहमीच आपल्या संवेदनशील आणि मदतीसाठी तत्पर स्वभावामुळे चर्चेत असतो. देशभरात इंडिगोच्या अनेक उड्डाणांना विलंब व रद्दीकरणाचा फटका बसल्यानंतर हजारो प्रवासी विमानतळावर अडकले होते. तांत्रिक अडचणी, हवामान आणि नवीन क्रू-रोस्टर नियमांमुळे उड्डाण वेळापत्रक कोलमडले. अशा वेळी सोनू सूदने प्रवाशांना शांत राहण्याचे आणि इंडिगोच्या ग्राउंड स्टाफवर राग काढू नये असे आवाहन केले आहे.

"माझं कुटुंबही ४–५ तास अडकलं होतं" -सोनू सूद

अभिनेता सोनू सूदने या संदर्भात आज (दि. ६) सकाळी एक व्हिडिओ 'एक्स'वर शेअर करत सांगितले की त्याचे कुटुंबिय देखील उड्डाण विलंबामुळे ४-५ तास विमानतळावर अडकले होते. “त्यांच्या फ्लाइटनं नंतर उड्डाण केलं आणि ते सुरक्षित पोचले, पण अनेक प्रवाशांच्या फ्लाइट रद्द झाल्या. काहींना लग्नांना, महत्वाच्या मिटिंग्सला जायचं होतं जे जाता आलं नाही. लोकांना मोठं नुकसान झालं, हे खरं आहे” असं तो म्हणाला.

कर्मचाऱ्यांवरील संताप पाहून खेद व्यक्त

मात्र त्याला सर्वाधिक दुःख झालं ते विमानतळावरील कर्मचाऱ्यांवर निघालेल्या संतापामुळे. "लोकांनी ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्या, जशा भांडणाच्या घटना घडल्या… ते खूप दुर्दैवी आहे. ग्राउंड स्टाफला स्वतःला देखील पुढचं वेळापत्रक काय आहे याची माहिती नसते. त्यांच्याकडे जे मेसेज येतात, तेच ते प्रवाशांपर्यंत पोचवतात. त्यांच्यावर राग काढण्यात काही अर्थ नाही," असं सोनू म्हणाला.

"हेच कर्मचारी नेहमी तुमची काळजी घेतात"

त्याने पुढे सांगितले, "हेच कर्मचारी नेहमी आपली काळजी घेतात. इन-फ्लाइट क्रू असो किंवा ऑन-ग्राउंड स्टाफ, ते प्रत्येकाला हसत-हसत सेवा देतात. मग त्यांच्या कठीण प्रसंगात आपणही त्यांना समजून घ्यायला हवं."

प्रवाशांना सोनू सूदचे आवाहन

शेवटी सोनू सूदने सर्व प्रवाशांना आवाहन केले , " या कठीण प्रसंगात शांत राहा, तुमचा राग नियंत्रित करा. स्टाफची चूक नाही. ते फक्त आपलं काम करत आहेत. आपण जबाबदार नागरिक म्हणून त्यांना साथ देणं हेच योग्य."

इंडिगोच्या उड्डाणांत सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर सोनू सूदचा हा संदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

IndiGoची मोठी घोषणा; प्रवाशांचे पैसे परत मिळणार, री-शेड्युलिंग शुल्क शून्य

नाशिकच्या १८०० झाडांवर कुऱ्हाड? मनसेनंतर आदित्य ठाकरेंची एंट्री; भाजप-बिल्डर लॉबीवर घणाघात, "भाजपच्या बिल्डर मित्रांची...

Thane : भिवंडीत डॉ. बाबासाहेबांच्या श्रद्धांजली बॅनरचा अपमान; दोघांविरोधात गुन्हा दाखल

महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आंबेडकरांना अभिवादन; "त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत...

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी झाली सरवणकरांची सून; लग्नानंतर नवदाम्पत्य पोहचलं सिद्धिविनायक मंदिरात! पाहा खास Photos