हिंदी मालिकांमधून घराघरात पोहोचलेली आणि विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात ताराबाईंची भूमिका साकारणारी मराठमोळी अभिनेत्री संचिता उगले हिने रविवारी (दि. १४) वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा येथील राहत्या घरी ती मृतावस्थेत आढळून आली. तिच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या प्रकरणाचा पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
राहत्या घरी मृतावस्थेत आढळली
आयएएनएसच्या वृत्तानुसार, १४ जून रोजी नालासोपारा पूर्वेतील आचोळे गावातील साई संतोषी इमारतीमधील राहत्या घरी संचिताने साडीने गळफास घेतला. ही घटना सायंकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे.
संचिता उगले ही आई-वडील आणि १५ वर्षीय धाकट्या बहिणीसह नालासोपाऱ्यात राहत होती. रविवारी संध्याकाळी तिची बहीण अंजली काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्यावेळी, घरात कोणीही नसताना ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही वेळाने कुटुंबीयांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
आचोळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद बाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक चौकशी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अकस्मात मृत्यूची नोंद
संचिताचे वडील मच्छिंद्र उगले यांच्या तक्रारीवरून १५ जून रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद (एडीआर) करण्यात आली आहे.
हिंदी मालिकांमधून मिळवली ओळख
संचिता उगले ही हिंदी मालिकांच्या प्रेक्षकांमध्ये परिचित चेहरा होती. 'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया', 'दिलवाली दुल्हा ले जाएगी' आणि 'साजन घर' यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे तिने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.
'छावा' चित्रपटात साकारली ताराबाईंची भूमिका
टीव्हीसोबतच संचिताने चित्रपट क्षेत्रातही काम केले होते. विकी कौशल अभिनीत 'छावा' चित्रपटात तिने ताराबाईंची भूमिका साकारली होती. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांनी तिच्या कामाचे कौतुक केले होते.
शेवटची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
संचिता सोशल मीडियावरही सक्रिय होती. तिच्या निधनानंतर तिची शेवटची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेल्या रीलमध्ये ती 'डफली वाले' या गाण्यावर आनंदाने नाचताना दिसत आहे. निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांनी या पोस्टवर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
मानसिक आरोग्याबाबत व्यक्त केली होती चिंता
गेल्या वर्षी एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या मृत्यूनंतर संचिताने तरुणांमधील वाढत्या मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. सोशल मीडियावरील अनेक गोष्टी आणि त्याचा भावनिक आरोग्यावर होणारा परिणाम यावरही तिने भाष्य केले होते.
तिच्या अकाली निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी कलाकार आणि चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मालिका विश्व आणि चित्रपट क्षेत्रातील अनेकांनी तिच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे.