मुंबई : राज्यातील टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखवले जावेत. या चित्रपट प्रदर्शनादरम्यान शासकीय योजनांच्या जाहिरातींचीही प्रसिद्धी करावी. याबाबत विभागाने तातडीने योग्य पावले उचलावी, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
टुरिंग टॉकीज तंबुतील सिनेमांचे जतन व पुनर्वसन यासंदर्भात वनमंत्री मुनगंटीवार यांनी मंत्रालयातील परिषद सभागृहात बैठक घेतली. बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, चित्रनगरीचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्यासह टुरिंग टॉकीजचे मालक व प्रतिनिधी उपस्थित होते.
टुरिंग टॉकीज व तंबूमधून ऐतिहासिक चित्रपट दाखविल्यास थोर महापुरुषांचे विचार व कार्य घराघरात पोहोचेल. या चित्रपट प्रसारण प्रसंगी शासकीय योजनांच्या जाहिरातीही दाखविल्यास शासकीय योजनाही तळागाळापर्यंत पोहोचण्यास मदत होईल, असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.