"कृपया मला मदत करा…"; विशाखा सुभेदारांचा मुलगा अडकला कुवेतमध्ये, अभिनेत्रीला अश्रू अनावर; Video 
मनोरंजन

"कृपया मला मदत करा…"; विशाखा सुभेदारांचा मुलगा अडकला कुवेतमध्ये, अभिनेत्रीला अश्रू अनावर; Video

इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. “कृपया मला मदत करावी…” अशी आर्त विनंती करत त्यांनी भावनिक व्हिडीओ शेअर केला असून, चार दिवसांपासून मुलगा कुवेतमध्ये अडकला असल्याची माहिती दिली आहे.

Mayuri Gawade

इराण-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाल्याने मध्यपूर्वेतील परिस्थिती चिघळली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाचा फटका आता सर्वसामान्य भारतीय कुटुंबांनाही बसू लागला आहे. अचानक रद्द झालेली उड्डाणं, अनिश्चित परिस्थिती आणि वाढता तणाव यामुळे अनेक जण परदेशात अडकले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा अभिनय सध्या कुवेतमध्ये अडकला असून, मुलाच्या सुरक्षिततेबद्दल चिंताग्रस्त झालेल्या विशाखा यांनी सरकारकडे कळकळीची मदत मागितली आहे.

लंडनच्या प्रवासात कुवेतमध्ये अडकल्याची घटना

लंडनला जात असताना त्याचे विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आले. त्यानंतर तणावपूर्ण परिस्थितीमुळे पुढील उड्डाणे रद्द झाली आणि तो गेल्या चार दिवसांपासून तिथेच थांबला आहे. मुलाच्या सुरक्षिततेबद्दल चिंतित असलेल्या विशाखा यांनी सोशल मीडियावर भावनिक व्हिडीओ शेअर करत सरकारकडे मदत मागितली आहे.

अनेक मुलांच्या आया त्यांच्या परतण्याची वाट बघतायत...

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये विशाखा यांनी म्हटलंय, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझी विनंती आहे. माझा मुलगा लंडनच्या प्रवासाला निघाला होता; पण त्याचं फ्लाइट कुवेतमध्ये उतरवण्यात आलं. सध्याच्या परिस्थितीमुळे तिथली विमानं रद्द झाली आहेत. त्यामुळे माझा मुलगा चार दिवसांपासून कुवेतमध्ये अडकला आहे. आता तिकडची परिस्थिती गंभीर होत चालली आहे हे आपण बातम्यांमधून पाहतोय. अनेक ड्रोन हल्लेसुद्धा होत आहेत. तो स्वतः तिथे हे अनुभवत आहे. आता तिथल्या एका हॉटेलमध्ये - एअरलाईन्स सर्व्हिसकडून त्याची व्यवस्था केली गेली आहे. त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न करावेत. जसं दुबईच्या लोकांना परत आणलं गेलं, तसं कुवेतमध्येसुद्धा भारतीय अडकले आहेत. त्यांना परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी माझी कळकळीची विनंती आहे. अनेक मुलांच्या आया, घरचे कुटुंबीय त्यांच्या मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत. त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्याची व्यवस्था करावी. आमच्या मुलांची काळजी घ्यावी. सरकार आणि भारताच्या पंतप्रधानांना विनंती करते की, सर्व भारतीय सुखरूप परतावेत यासाठी लवकरात लवकर मार्ग काढावा."

पाहा व्हिडिओ

सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही त्यांनी, “कृपया मला मदत करावी. माझा मुलगा अभिनय कुवैतमध्ये अडकला आहे,” असे लिहित भारत सरकारसह पंतप्रधान आणि राज्यातील नेत्यांना टॅग करत मदतीची मागणी केली आहे. सध्या त्यांच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार