नवशक्ति अक्षररंग
मनोरंजन

World Book Day 2025 Special : तत्त्वनिष्ठ कलायात्रिकाचा चिंतन 'ऐवज'

चित्रकार, नट, लेखक, दिग्दर्शक, अभिवाचक, निर्माता, असहमतीदार आणि जबाबदार नागरिक असलेल्या अमोल पालेकरांचं ‘ऐवजः एक स्मृतिबंध’ हे मराठी आणि ‘व्ह्यूफाइंडरः ए मेमॉयर’ हे इंग्रजी अशी दोन बहुभाषी आठवणपर पुस्तकं गेल्या नोव्हेंबरात एकाचवेळी प्रकाशित झाली. तत्त्वनिष्ठा, कलानिष्ठा आणि समाजनिष्ठा ही पालेकरांची गुणवैशिष्ट्यं त्यातून लख्खपणे उजळून पुढे आली. त्यावरचेच हे काही ठसे, काही निरीक्षणं...

नवशक्ती Web Desk

- रसास्वाद

- शेखर देशमुख

इतका समृद्ध प्रवास कला क्षेत्रात झालाय, जवळपास पन्नास वर्षांचा उपयोजित कलांचा इतिहास ते जगलेत, तरीही आत्मचरित्रात्मक, आत्मकथनपर असं काहीच कसं अजून वाचकांच्या पुढ्यात आलेलं नाही, असा विचार ज्यांच्याबाबतीत बराच काळ डोक्यात घोळत होता, त्या चित्रकार, नट, लेखक, दिग्दर्शक, अभिवाचक, निर्माता, असहमतीदार आणि जबाबदार नागरिक असलेल्या अमोल पालेकरांचं ‘ऐवजः एक स्मृतिबंध’ हे मराठी आणि ‘व्ह्यूफाइंडरः ए मेमॉयर’ हे इंग्रजी अशी दोन बहुभाषी आठवणपर पुस्तकं गेल्या नोव्हेंबरात एकाचवेळी प्रकाशित झाली. तत्त्वनिष्ठा, कलानिष्ठा आणि समाजनिष्ठा ही पालेकरांची गुणवैशिष्ट्यं त्यातून लख्खपणे उजळून पुढे आली. त्यावरचेच हे काही ठसे, काही निरीक्षणं...

सरधोपट आत्मचरित्राला आत्मप्रेमाचा, आत्मप्रौढीचा किंवा आत्मस्तुतीचा वास येतो, हा विचार किंवा हा सवाल अमोल पालेकरांच्या डोक्यात आला असेल का? असेलही. म्हणूनच कदाचित एकरेषीय, एक मार्गीय आयुष्य जसं वयाच्या क्रमात पुढे सरकत गेलं तसं बालपण, तारुण्य, प्रौढपण आणि जोडीला नाटक, सिनेमा, संगीत अशी कप्पेबंद मांडणी न करता त्यांनी त्या त्या प्रसंगी स्फुरलेल्या विचारांचं आणि आठवणींचं बोट धरून भूत-वर्तमानाची, कधी मागे, कधी पुढे, कधी फ्लॅशबॅक, कधी वर्तमान अशी बॅक अँड फोर्थ मांडणी करून ‘ऐवज’ खुला केला असावा. हाही एकप्रकारचा वाचकांना सदासतर्क ठेवणारा, आपसूक स्वतःचा असा एक आकृतीबंध घेऊन आलेला शैलीदारपणाच.

आठवणींचे चिंतनशील हिंदोळे

पालेकरांचं आजचं वय ऐंशीचं आणि त्यांची कलाक्षेत्रातली कारकीर्द तब्बल सहा एक दशकांची. त्यांनी रुपेरी पडदा गाजवला तेव्हाचं जगणं आजच्या तुलनेत खूपसं साधं, गुंतागुंतमुक्त, मर्यादित महत्त्वाकांक्षा असलेलं होतं. प्रामाणिकपणा, प्रांजळपणा, पारदर्शकता, निरागसता समाजजीवनात बऱ्यापैकी टिकून होती. पडद्यावरचे पालेकर या सगळ्या गुणसमुच्चयांचं प्रतिनिधित्व करत होते. नाटक-सिनेमांतून त्यांनी हरतऱ्हेच्या भूमिका साकारल्या. मोठा पडदा-छोटा पडदा इथे दिग्दर्शनात मनाजोगे प्रयोग केले. पण ते लक्षात राहिले, मध्यमवर्गीय नायक म्हणून. हीच प्रतिमा त्यांना घराघरांत प्रेम देऊन गेली. आजच्या पन्नाशी, साठी आणि सत्तरीच्या वयात असलेल्या पिढीचा नॉस्टॅल्जिया त्यांच्याशी जोडला गेला, तो तेव्हापासून. मधल्या काळात जगाचा चेहरा आणि ओळख बदलली. समाजाच्या धारणा, आवडीनिवडी, कल आणि आग्रह बदलले. एकेकाळची समाज व्यापून असलेली लाजीरवाणी गरिबी ते आजची उधळी, बीभत्सपणाकडे झुकत चाललेली श्रीमंती या टोकाच्या स्थित्यंतरात समाजातल्या विशिष्ट वर्गाच्या कलाजाणिवा विस्तारत गेल्या. आताचा काळ या कला जाणिवांच्याच नव्हे, तर एकूणच विविधांगी जाणिवांच्या पानगळीचा. झडीचा. म्हटला तर धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि कला यांच्या इतिहासाची नोंद घेणारा हा सहा दशकांचा काळ. या काळात अमोल पालेकर हे व्यक्ती म्हणून, चित्रकार-नट-दिग्दर्शक म्हणून घडत गेले. ही जडणघडण आपण कोण आहोत, कुठे उभे आहोत याचं भान जपत आणि मुख्य म्हणजे आसपासच्या समाजाशी असलेला धागा न सोडता आठवणींच्या हिंदोळ्यासारखी वाचकांच्या पुढ्यात येत जाते. यात हिंदी-मराठी-बंगाली-दाक्षिणात्य चित्र-नाट्य-साहित्य सृष्टीतले एकाहून एक दिग्गज त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांसह आणि वैगुण्यांसह सुद्धा भेटतात. मात्र इथे येणारी स्वभाववैगुण्य त्या त्या व्यक्तीविषयी तुच्छताभाव राखून येत नाहीत, तर पालेकरांच्या तत्त्वनिष्ठ, तर्क आणि मीमांसेच्या स्वभावगत मागणीतून येत राहतात. त्यात प्रसंगी तर्ककठोरपणाही जाणवतो आणि प्रसंगी तितक्याच कठोरपणे आलेली एखाद्या व्यक्तीबाबतची त्यांची नापसंतीही जाणवते.

पालेकर ज्या क्षेत्रात वावरतात किंवा आजवर वावरले, त्याकडे तिथल्या मंडळींची पाहण्याची दृष्टी धंद्याची. धंदेवाईक. जो चलता है वो बिकता है...उगते सूरज को सलाम... असं इथलं चालचलन असतं. तिथे तत्त्वाला धरून चालणारी व्यक्ती स्वागतास अपात्र असते. अदखलपात्र असते. मात्र असं असूनही पालेकर इथे आपलं अस्तित्व, आपलं स्थान टिकवून ठेवतात. इथेच त्यांच्यामध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दमसासाची वाचकांना जाणीव होते.

चिकित्सक वृत्ती हा अकादमिक वर्तुळात गुण मानला जातो, सिनेमा-नाटकाच्या धंद्यात हाच अवगुण ठरतो. पण हा अवगुण पालेकरांनी धाडसाने जपला. म्हणूनही हृषिकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी, राजेश खन्ना, पं. सत्यदेव दुबे, श्याम बेनेगल, विजया मेहता अशा एकाहून एक दिग्गजांना विचारांच्या पातळीवर जाऊन भिडण्याचं, सवाल करण्याचं सामर्थ्य त्यांनी दाखवलं. जी. ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, किशोरी अमोणकर, संगीतकार जयदेव, चि. त्र्यं. खानोलकर ऊर्फ कवी आरती प्रभू, नाट्यदिग्दर्शक बादल सरकार, अभिनेत्री स्मिता पाटील, अभिनेते अमरिश पुरी, हैदर अली, पार्श्वगायिका आशा भोसले यांच्याशी आत्मीय ओलाव्याचे बंध आयुष्यभर जपले. आपण वावरलो, त्या चित्र-नाट्यसृष्टीचा काहीसा विकृत-विचित्र चेहरासुद्धा उघड केला. सिनेमा धंद्यात यशोशिखरावर असताना प्रायोगिक रंगभूमीवर वावरण्याचा हट्ट आवडीने पुरा केला. समांतर चित्रपटांतून आपल्या सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय भूमिका उघडपणे मांडल्या. ८०-९० च्या दशकांपासून टीव्ही मालिकांतून सुसंस्कृत आणि सभ्य समाजाच्या कितीतरी शक्यता प्रेक्षकांपुढे ठेवल्या. बदलत्या नातेसंबंधानुसार आसपास बदलतो. माणसं बदलतात. नात्यांचे पोत विरतात, प्रसंगी एकटेपण, उपरेपण येतं. अनेकदा ते लादलं जातं. पण त्याचाही पालेकरांनी स्वीकार केला. या अवकाशातच जगण्याविषयीचं, मरणाविषयीचं त्यांचं आत्मचिंतन घडून आलं. यातूनच आकारास आला तो, हा ‘ऐवज’.

असहमतीदारांचा आवाज

अर्थात, या सगळ्यांत लक्ष वेधून घेतात, ते असहमतीदारांशी पाठराखण करणारे, त्यांना वेळोवेळी बळ देणारे, त्या असहमतीच्या सुरात आपला सूर मिसळणारे आणि सजग नागरिकत्वाचा हरघडी प्रत्यय देणारे (याचा उल्लेख दिल्लीतल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी पत्रकार रविशकुमारनेही आवर्जून केला होता.) अमोल पालेकर. ठरवलं तर एक सजग असलेला नागरिक प्रस्थापित व्यवस्थेला किती स्तरांवर आणि कुठेकुठे भिडू शकतो, याचे कितीतरी दाखले या पुस्तकात अगदी ओघाने येतात. यातून लोकशाही राष्ट्रातली नागरिक बनण्याची प्रक्रियाही उलगडत जाते. हे आजच्या सटकलेल्या काळात कितीतरी महत्त्वाचं.

खरं तर, नागरिकशास्त्राच्या जोडीने अमोल पालेकरांचा हा ‘ऐवज’ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवा. एक धडा म्हणून शिकवला जायला हवा, इतका हा मोलाचा आहे. सगळ्यांत महत्त्वाचं काय, तर आपल्या वैचारिक, राजकीय भूमिका न लपवता, न झाकता पालेकरांनी हा ऐवज खुला केला आहे. त्या अनुषंगाने नरेंद्र दाभोलकर हत्येनंतरच्या निषेध मोर्चात आणि अलीकडे राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सामील झालेल्या पालेकरांची छायाचित्रं आहेत.

‘विरोध करण्यावर ज्यांचा विश्वास आहे, त्या सगळ्यांना...’ ही पुस्तकाला असलेली अर्पणपत्रिका पुरेशी बोलकी आहे.

मुखपृष्ठावर उल्लेखल्याप्रमाणे हे सरधोपट आत्मचरित्र नाही, तर हा स्मृतिबंध आहे. चढउतारांसह भूतकाळ आणि वर्तमान एकमेकांत गुंफलेला. त्या अर्थाने ही बहुपेडी गुंफणही आहे, बहुरंगी जगण्याची. आठवणींची, लोभस नि रुखरुख देणाऱ्या क्षणांची. दुरावलेल्या माणसांची, आयुष्याला नवा अर्थ देणाऱ्या नात्यांची. सात्विक निषेधाची, संतापाची. मनसोक्त भ्रमंतीची, एकांत क्षणांची. सहमतीच्या आणि असहमतीच्या जोरकस उद्गारांचीही. या बंधाला एकप्रकारचा गंधही आहे. कलासक्ततेचा, आस्वादक आग्रहाचा आणि कठोर निग्रहाचा. जाणीवनेणिवांच्या समृद्धीचा. तत्त्वनिष्ठेचा आणि अर्थातच कलानिष्ठेचा व समाजनिष्ठेचाही. अखंड, अव्याहत सुरू राहिलेल्या चिंतन आणि मननाचा. अर्थातच आत्मशोधाचाही.

सजग नागरिकाची लक्षणं

अगदी शीर्षकापासून या स्मृतिबंधांची सजावट, मांडणी, रंगसंगती असं सारं एकप्रकारची सौंदर्यदृष्टी राखून झालेलं आहे. शीर्षकाला स्वतःचं असं एक देखणेपण आहे, डौल आहे. ही दृष्टी ख्यातनाम मानवाधिकार कार्यकर्त्या वकील आणि पालेकरांच्या पार्टनर असलेल्या संध्या गोखलेंची. चित्र-शिल्पाचा जसा एक क्युरेटर-पालनकर्ता असतो, तशाच पालनकर्त्याच्या रूपात ‘ऐवज’ हे पुस्तक आपल्याला संध्या गोखलेंची ओळख करून देतं. किंबहुना असंही म्हणता येतं, की संध्या यांनी या पुस्तकाचा एखाद्या चित्र-शिल्पाप्रमाणे विचार केला, तसा याला आकार दिला. ‘व्ह्यूफाइंडर’ या इंग्रजी स्मृतिबंधाच्या लेखिका-अनुवादिकाही त्याच. मराठीत हा ऐवज पुस्तकरूपात पेश केलाय, तो मधुश्री पब्लिकेशन्सने आणि इंग्रजीत वेस्टलँड बुक्सने. दोघाही प्रकाशकांनी पालेकरांच्या सौंदर्यलक्ष्यी लौकिकास साजेशा साहित्यकृतींची निर्मिती केलीय. पालेकरांबद्दल आत्मियता असलेले वाचक-प्रेक्षक हा ऐवज संग्रही ठेवतीलच, पण लोकशाही राष्ट्रातला सजग नागरिक कसा असावा, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या वैचारिक विरोधकांनीही थोडी वाट वाकडी करणं आवश्यक आहे. कारण, अशा शहाणिवेच्या चार गोष्टी यापुढील काळात पुस्तकातही सापडण्याची शक्यता दुरापास्त असणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार, अनुवादक व स्थलांतरितांच्या प्रश्नांचे अभ्यासक.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल