वॉशिंग्टन : गेल्या काही वर्षांत जगात आर्थिक असमानता वाढीस लागली आहे. जगात काही मोजके लोक अतिश्रीमंत बनले असून गरीब अधिक गरीब बनले आहेत. गेल्या चार वर्षांत जगात ५०० कोटी जण गरीब बनले आहेत, तर दुसऱ्या बाजूला ५ श्रीमंतांची संपत्ती दर तासाला १०० कोटींनी वाढली, असा अहवाल ‘ऑक्सफॉम’ इंटरनॅशनलने दिला आहे.
दावोसच्या जागतिक आर्थिक परिषदेपूर्वी हा अहवाल सादर झाला आहे. ऑक्सफॉमच्या अहवालानुसार, आर्थिक असमानता गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागली आहे. गेल्या चार वर्षांत कोरोना महासाथ, युद्ध व महागाईमुळे जगातील अब्जावधी लोक गरीब बनले, तर २०२० नंतर आतापर्यंत जगात ५०० कोटी लोक गरीब झाले. ५ श्रीमंतांची संपत्ती प्रचंड वाढली
‘असमानता’ या नावाने जारी झालेल्या अहवालानुसार, जगातील ५ श्रीमंतांची संपत्ती गेल्या चार वर्षांत ८६९ अब्ज डॉलर्सने वाढली आहे. याचाच अर्थ जगातील पाच श्रीमंतांची दर तासाला १४ दशलक्ष डॉलर्सने कमाई झाली. भारतीय चलनात ही रक्कम ११६ कोटी रुपये झाली. याचाच अर्थ ४ वर्षांत या श्रीमंतांची कमाई तासाला १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली.
हे आहेत जगातील ५ अतिश्रीमंत
फोर्ब्जच्या अब्जाधीश यादीनुसार, जगात सर्वाधिक श्रीमंत एलॉन मस्क असून त्यांची संपत्ती २३० अब्ज डॉलर्स, बर्नार्ड अर्नाल्ट यांची संपत्ती १८२.४ अब्ज डॉलर्स असून ते दुसऱ्या क्रमांकावर, ॲॅमेझॉनचे जेफ बेजोस हे १७६.९ अब्ज डॉलर्सने तिसऱ्या क्रमांकावर तर लॅरी एलिसन १३५.२ अब्ज डॉलर्सने चौथ्या क्रमांकावर तसेच मार्क झुकरबर्ग १३२.३ अब्ज डॉलर्सने पाचव्या क्रमांकावर आहेत.
२२९ वर्षे गरिबी हटणार नाही
जगातील सर्व अब्जाधीशांची संपत्ती एकत्रित केल्यास ती जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. जगातील अब्जाधीशांची संपत्ती गेल्या चार वर्षांत ३.३ ट्रिलियन डॉलर्सने वाढली आहे. जगातील पाचवी अर्थव्यवस्था भारताचा जीडीपी अजूनही ३.५ ट्रिलियन डॉलर्स आहे. जगातील अतिश्रीमंतांची संपत्ती अशीच वाढत राहिल्यास जगाला लवकरच एक ट्रिलियन डॉलर्सवाला पहिला अब्जाधीश मिळेल, तर जगातील गरिबी २२९ वर्षे संपणार नाही, असे ऑक्सफॉमने अहवालात म्हटले आहे.