आकाशात उड्डाण घेतलेल्या प्रवाशांना शनिवारी (दि. १८) भीषण प्रसंगाचा सामना करावा लागला. ‘एअर चायना’च्या हांगझोऊहून सिओलकडे जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशाच्या बॅगमधील लिथियम बॅटरीला अचानक आग लागल्याने विमानात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि विमानाचे शांघायमध्ये सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
फ्लाइट क्रमांक सीए १३९ हे विमान सकाळी ९:४७ वाजता हांगझोऊहून उड्डाण करून दुपारी १२:२० वाजता दक्षिण कोरियातील इंचेऑन विमानतळावर पोहोचण्याचे नियोजित होते. मात्र, टेकऑफनंतर काही मिनिटांतच केबिनमधील ओव्हरहेड लगेज कंपार्टमेंटमधून धूर निघू लागला आणि आग लागल्याचे लक्षात आले.
व्हायरल व्हिडिओत कैद झाले थरारक दृश्य
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की ओव्हरहेड लगेज कंपार्टमेंटमध्ये आग लागली आहे. प्रवासी घाबरून मदतीसाठी ओरडत आहेत. प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसत आहे.
पाहा व्हिडिओ -
कर्मचाऱ्यांनी दाखवली तत्परता
एअर चायनाच्या निवेदनानुसार, विमान कर्मचार्यांनी फायर एक्सटिंग्विशरच्या साहाय्याने काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली. त्यानंतर वैमानिकांनी तात्काळ विमान वळवून शांघाय पुडोंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला दुखापत झालेली नाही. एअरलाइनने सर्व प्रवाशांना आवश्यक ती मदत आणि पुढील प्रवासासाठी व्यवस्था करून दिली.
लिथियम बॅटरीचा वाढता धोका
लिथियम बॅटरीमुळे विमानप्रवासादरम्यान लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा घटना टाळण्यासाठी अनेक विमान कंपन्यांनी पॉवर बँक, लॅपटॉप आणि इतर रिचार्जेबल उपकरणांवरील नियम अधिक कडक केले आहेत. तरीही प्रवाशांकडून होणाऱ्या निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना अधूनमधून घडताना दिसतात.