आंतरराष्ट्रीय

विमान अपघातांची मालिका सुरूच! अमेरिकेमध्ये टेकऑफआधीच विमानाला आग; थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात विमान अपघातांच्या घटनांची मालिका सुरूच आहे. अशाच आणखी एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना अमेरिकेतील डेनवर इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडली असून, अमेरिकन एअरलाईन्सच्या फ्लाइट AA3023 मध्ये टेकऑफपूर्वीच भीषण आग लागली.

नेहा जाधव - तांबे

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात विमान अपघातांच्या घटनांची मालिका सुरूच आहे. अशाच आणखी एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ही घटना अमेरिकेतील डेनवर इंटरनॅशनल एअरपोर्टवर घडली असून, अमेरिकन एअरलाईन्सच्या फ्लाइट AA3023 मध्ये टेकऑफपूर्वीच भीषण आग लागली.

हे विमान मियामीकडे उड्डाण करण्याच्या तयारीत असताना अचानक लँडिंग गिअर फेल झाले. त्यानंतर विमानाच्या मागील भागाला आग लागली आणि काही क्षणांतच सर्वत्र धुर पसरला. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

अचानक लागली आग, प्रवाशांची धावपळ

ही घटना शनिवारी (२६ जुलै) दुपारी २:४५ च्या सुमारास घडली. विमान धावपट्टीवरून टेकऑफ करण्यावेळी धूर आणि आगीचा भडका उडाल्याने तातडीने टेकऑफ थांबवण्यात आले. या विमानात १७३ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. सुदैवाने, पायलट आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना इमर्जन्सी स्लाइडच्या माध्यमातून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेत ६ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. फायर विभागाने वेळेवर पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले.

पाहा व्हिडिओ -

तब्बल ८७ फ्लाइट्सवर परिणाम

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओमध्ये घाबरलेले प्रवासी धुराने व्यापलेल्या विमानातून इमर्जन्सी स्लाइडवरून खाली येताना दिसत आहेत. धूर आणि आगीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत एअरपोर्टवर ग्राउंड स्टॉप लागू करण्यात आला होता. त्यामुळे ८७ उड्डाणे विलंबित झाली. त्यानंतर विमानतळावरील कामकाज सामान्यपणे सुरू झाले. परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर प्रवाशांना मियामीला नेण्यासाठी नवीन विमान उपलब्ध करून देण्यात आले.

तांत्रिक बिघाडामुळे आगीचा भडका

अमेरिकन एअरलाईन्सने अधिकृत निवेदनात सांगितले की, लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाडामुळे टायरमध्ये आग लागली. हा टायर आता सेवेतून हटवण्यात आला आहे. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास