X
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला; गुप्तचरांच्या गोळीबारात हल्लेखोर युवक ठार, ट्रम्प यांच्या उजव्या कानाला लागली गोळी

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी पेनसिल्व्हेनियात घडली.

Swapnil S

शिकागो/वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना शनिवारी पेनसिल्व्हेनियात घडली. सुदैवाने ट्रम्प या हल्ल्यातून बचावले असून त्यांच्या उजव्या कानाला गोळी लागली आहे. एका युवकाने पेनसिल्व्हेनियातील जाहीर सभेत ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी लागली. हल्ला करणारा युवक गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला असून त्याचे नाव थॉमस क्रूक असे आहे. त्याचप्रमाणे गोळीबारात अन्य एका व्यक्तीचाही मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा जगभरातून तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे.

येत्या नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ट्रम्प यांची रिपब्लिकन पार्टीकडून उमेदवारी जाहीर होण्यास काही दिवस उरलेले असतानाच हा हल्ला झाला आहे. बटलर टाऊन येथे मोकळ्या जागेवर ट्रम्प यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. ट्रम्प यांचे भाषण सुरू असतानाच अचानक गोळीबाराच्या फैरी झाडण्यात आल्या. गोळीबाराच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे ट्रम्प यांनी कानावर हात ठेवले. ट्रम्प यांच्या पाठीमागून किंचाळण्याचा आवाज ऐकू येत असतानाच कोणीतरी ‘खाली बसा, खाली बसा’, अशी भीती व्यक्त करणारी सूचना केली. तेवढ्यात गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांच्याभोवती सुरक्षेचे कडे केले. गोळीबारामुळे भीतीचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि जमलेले श्रोते सैरावैरा पळू लागले.

या गोळीबारात ट्रम्प यांच्या उजव्या कानाला गोळी लागली आणि त्यांच्या कानातून रक्त वाहताना दिसत होते. त्यांना व्यासपीठावरून खाली नेत असताना ट्रम्प यांनी मूठ आवळून हवेत उंचावली आणि उपस्थितांना 'लढा' असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाडीत बसविण्यात आले आणि पीटर्सबर्ग परिसरातील रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत असताना ट्रम्प यांनी आपल्याला आपले बूट घेऊ द्या, असे सांगितले.

या गोळीबारात एक जण ठार झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न या दृष्टिकोनातून या घटनेचा तपास केला जात आहे. हल्लेखोराला गुप्तचर सेवेतील एका कर्मचाऱ्याने गोळ्या घालून ठार केले. ट्रम्प यांची प्रकृती ठणठणीत असल्याचा निर्वाळा त्यांच्या प्रवक्त्याने दिला आहे. हल्लेखोराचे नाव थॉमस क्रूक असे असून तो बेथेल पार्क येथील रहिवासी असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे, मात्र अधिकाऱ्यांनी हल्लेखोराची माहिती जाहीर केलेली नाही.

या प्रकारानंतर ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यम खात्यावर नेमकी काय घटना घडली आणि आपल्याला कितपत इजा झाली ते लिहिले आहे. आपल्या देशात अशी घटना घडू शकते हे अविश्वसनीय आहे. सध्या हल्लेखोराबाबत कोणतीच माहिती नाही, तो मृत झाला आहे. आपल्यावर झाडण्यात आलेली गोळी उजव्या कानाच्या वरील भागात घुसली, खूप रक्तस्राव झाला, देव अमेरिकेचे रक्षण करो, असे ट्रम्प यांनी ‘पोस्ट’मध्ये म्हटले आहे. अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ट्रम्प यांना रिपब्लिकन पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात येणार होते, त्याच्या दोन दिवस अगोदरच हा हल्ला झाला आहे. घटनास्थळापासून २०० ते ३०० मीटर अंतरावर असलेल्या एका छतावरून हल्लेखोराने गोळ्या झाडल्या. त्याच्याकडे एआर-स्टाइल रायफल होती.

या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला, त्याचप्रमाणे बायडेन यांनी पेनसिल्व्हेनियाचे गव्हर्नर जोश शॅपिरो आणि बटलरचे महापौर बॉब डॅण्डो यांच्याशीही संपर्क साधला, असे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले, मात्र ट्रम्प आणि बायडेन यांच्यात काय संभाषण झाले ते व्हाइट हाऊसकडून स्पष्ट करण्यात आले नाही. या घटनेचा प्रत्येकाने निषेध केला पाहिजे, असे बायडेन म्हणाले.

जगभरातील नेत्यांकडून निषेध

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर आदींनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राजकारण आणि लोकशाहीत हिंसाचाराला स्थान नाही. या हल्ल्याचा आपण तीव्र शब्दांत निषेध करतो असे मोदी यांनी म्हटले आहे, तर राहुल गांधी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. घटनास्थळावरील दृश्य पाहून आपण भयभीत झालो, कोणत्याही स्वरूपातील राजकीय हिंसाचाराला समाजात स्थान नाही, असे ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी म्हटले आहे, तर लोकशाहीसाठी ही शोकान्तिका असल्याचे फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीज, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की, न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन आदी जगभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.

हल्ल्यानंतर बायडेन यांनी केले देशाला उद्देशून भाषण

हल्ल्यानंतर दोन तासांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात बायडेन म्हणाले की, भविष्यात अशा प्रकारची घटना आपण घडू देऊ शकत नाही, अमेरिकेमध्ये हिंसाचार ही कल्पनाच सहन होत नाही, असेही ते म्हणाले. अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस आणि माजी अध्यक्ष बराक ओबामा, जॉर्ज बुश, बिल क्लिंटन यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्रम्प यांची कन्या इन्वान्का ट्रम्प यांनीही एक निवेदन जारी केले असून सुरक्षा दलांचे आभार मानले आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी