आंतरराष्ट्रीय

गुगलची चॅट जीपीटीला शह देण्यासाठी बार्ड ही चॅटबॉट यंत्रणा ; काय आहे नेमकं या यंत्रणेमध्ये ?

चॅट जीपीटी ही एआय आधारित चॅटबॉट सेवा आहे. ही सेवा देणारे अ‍ॅपलिकेशन टिक टॉक आणि इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मला मागे टाकत इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारे युजर अ‍ॅप

वृत्तसंस्था

सर्च इंजिनमध्ये एकाधिकारशाही असलेल्या गुगलपुढे आव्हान निर्माण करणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या चॅट जीपीटीने अमेरिकेत खळबळ माजवली आहे. आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने गुगलने चॅट जीपीटीला शह देण्यासाठी बार्ड ही चॅटबॉट यंत्रणा आणली आहे.

गेल्या काही महिन्यांत मायक्रोसॉफ्टच्या चॅट जीपीटी सेवेने अमेरिकेसह जगभरात खळबळ उडवून दिली आहे. मायक्रोसॉफ्टने चॅट जीपीटीच्या माध्यमातून माहितीचा महासागर खुला केला आहे. अमेरिकेतील शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चॅट जीपीटी कमालीचे लोकप्रिय झाले आहे. काही दिवसांतच याचे कोट्यवधी वापरकर्ते झाल्याने गुगलच्या सर्च इंजिनला जबरदस्त शह बसला आहे. मात्र आता मायक्रोसॉफ्टच्या आर्टिफिशल इंटेलिजन्स आधारित चॅटजीपीटी सेवेला टक्कर देण्यासाठी गुगल सज्ज झाले आहे. चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी गुगलने आपली स्वत:ची एआय आधारीत ‘बार्ड’ ही चॅटबॉट सेवा विकसित केली आहे. या सेवेची चाचणी गुगलने सुरू केली आहे. ही सेवा चॅट जीपीटीपेक्षाही हायटेक असेल, असे म्हटले जात आहे. ‘अल्फाबेट’ व ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी आपल्या ब्लॉगमधून या संदर्भात माहिती दिली होती. आपल्या खास विश्वासातील वापरकर्त्यांमार्फत प्राथमिक चाचणी घेतल्यानंतर ही सेवा येत्या आठवडाभरात सर्वत्र सुरू होणार आहे.

बार्ड म्हणजे काय?

‘बार्ड’ ही यंत्रणा गुगलच्या लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अॅप्लिकेशन अर्थात LaMDA ने सुसज्ज आहे. ‘लॅमडा’ हा माणसासारखा विचार करू शकणारा गुगलचा कृत्रीम बुद्धीमत्ता आधारीत चॅटबॉट आहे. दोन वर्षांपूर्वी कंपनीने त्याचे लॉन्चिंग केले आहे. कंपनीच्या नव्या एआय चॅटबॉट बार्डची क्षमता तुलनेने अधिक असेल, असे पिचाई यांनी म्हटले आहे. बार्ड हा युजरचा फीडबॅक आणि वेबवर उपलब्ध माहितीच्या आधारे माहिती मिळवेल व तिचे विश्लेषण करेल. सुरुवातीला गुगल चाचणीसाठी ‘लॅमडा’च्या प्राथमिक मॉडेलसह एआय प्रणाली आणत आहे. त्यामुळे गुगलला अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचता येईल. भविष्यात यात आणखी सुधारणा केली जाणार आहे.

गुगल बार्डच्या मदतीने दैनंदिन कामे अधिक सुलभ होणार आहेत. बार्डच्या सहाय्याने दैनंदिन जीवनातील हरएक काम सुलभ होणार आहे. प्रत्येक कामात गुगलचे सहाय्य होणार आहे. अगदी फ्रीजमध्ये असलेल्या पदार्थापासून जेवणासाठी कोणता पदार्थ तयार करता येईल, याची आयडिया मिळू शकते. बार्डची क्षमता वाढवण्यासाठी गुगल युजर फीडबॅक आणि अंतर्गत चाचणीची मदत घेण्याचा विचार करत आहे. बार्डकडून युजर्सला योग्य माहिती मिळावी व त्याला सर्वोत्तम अनुभव यावा, माहितीची देवाण-घेवाण अधिक सुरक्षितपणे व्हावी, हा यामागे उद्देश आहे. येत्या आठवड्यात विश्वसनीय युजर्सना बार्डचा अॅक्सेस दिला जाणार आहे. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर बार्ड सेवा सर्वांसाठी खुली होईल.

चॅट जीपीटी काय आहे?

चॅट जीपीटी ही एआय आधारित चॅटबॉट सेवा आहे. ही सेवा देणारे अ‍ॅपलिकेशन टिक टॉक आणि इंस्टाग्रामसारख्या प्लॅटफॉर्मला मागे टाकत इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारे युजर अ‍ॅप बनले आहे. चॅट जीपीटी लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत युजर्सची संख्या १० कोटींवर पोहोचली आहे.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

झारखंडमध्ये ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकार; इंडिया आघाडीकडे बहुमत, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

‘सिंह’ म्हातारा झालाय!

‘बटेंगे तो कटेंगे’, ओबीसीने भाजपला तारले