फिनिक्स : अमेरिकेतील आगामी मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाची घसरण रोखण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी राजकीय खेळी खेळली आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला प्रतिनिधीगृह आणि सिनेट या दोन्ही सभागृहात बहुमत मिळाल्यास देशातील प्रत्येक प्रौढ अमेरिकन नागरिकाला ५,००० अमेरिकन डॉलर (सुमारे ४.२५ लाख रुपये) दिले जातील, अशी घोषणा ट्रम्प यांनी बुधवारी केली.
डॅलस येथे आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या मध्यावधी अधिवेशनात ट्रम्प म्हणाले, जर रिपब्लिकन पक्ष जिंकला, तर तुमचा विजय होईल आणि तुम्हाला ५,००० डॉलर मिळतील. देशाच्या भक्कम आर्थिक स्थितीचा हवाला देत त्यांनी या रकमेला 'ट्रम्प डिव्हिडंड' असे नाव दिले आहे. ट्रम्प यांच्या या आश्वासनामुळे अमेरिकन तिजोरीवर १ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त खर्च येईल. यामुळे देशाची आधीच असलेली १.८ ट्रिलियन डॉलरची वार्षिक अर्थसंकल्पीय तूट आणि महागाईचा भस्मासुर आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घोषणेनंतर अवघ्या तासाभरातच उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी यात स्पष्टीकरण देत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. हा लाभांश श्रीमंत नागरिकांना मिळणार नाही, असे सांगत त्यांनी याचे पैसे ट्रम्प सरकारच्या आयात शुल्कातून (टॅरिफ) वसूल केले जातील असे सुचवले.