एव्हियान-लेस-बाइन्स (फ्रान्स) : जोपर्यंत नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत, तोपर्यंत भारतावर कोणी हल्ला केलाच तर अमेरिका भारताच्या मदतीला धावून जाईल असे जाहीर आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी येथे दिले. जी-सेव्हन बैठकीसाठी आलेल्या पंतप्रधान मोदींसमवेत द्विपक्षीय बैठक झाल्यानंतर ट्रम्प हे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत होते.
मे २०२५ मधील 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची ही पहिलीच वन-ऑन-वन भेट होती. सुरक्षा आणि सहकार्यावर भर या शिखर परिषदेच्या निमित्ताने भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि संरक्षण सहकार्य अधिक गतिमान करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. जागतिक राजकारणात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत, ट्रम्प यांनी मोदींच्या नेतृत्वाचे समर्थन केले आहे.
या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या नेतृत्वाचे कौतुक केले. तसेच 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ' (हॉर्मुझची सामुद्रधुनी) या सागरी मार्गावरून जागतिक व्यापार सुरळीत आणि विनाअडथळा सुरू राहण्याच्या गरजेवर विशेष भर दिला. जागतिक सागरी मार्गांवर भारताचे धोरणात्मक हितसंबंध असल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ खुला राहणे हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सागरी दळणवळणाच्या स्वातंत्र्यावर भारताने नेहमीच भर दिला असून, या मुद्द्यावर आपण एकत्र काम केले पाहिजे.
भारताची भूमिका मोठी' - ट्रम्प
मोदींच्या या वक्तव्याला सकारात्मक प्रतिसाद देत ट्रम्प यांनी पश्चिम आशियात भारताची भूमिका महत्त्वाची असल्याचे मान्य केले आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला. सध्याच्या सरकारअंतर्गत भारताचा भूराजकीय प्रभाव वाढत असल्याचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, जोपर्यंत पंतप्रधान मोदी भारताचे नेतृत्व करत आहेत, तोपर्यंत पश्चिम आशियात भारताची भूमिका खूप मोठी आणि महत्त्वाची असेल.
याशिवाय, ट्रम्प यांनी उभय देशांमधील आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांचे आणि अमेरिकेतील भारतीय गुंतवणुकीचे कौतुक केले. अमेरिकन बाजारपेठेतील भारतीय व्यापारी गुंतवणुकीचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, मोदी अमेरिकेत बरीच मोठी कामे करत आहेत. ते अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर निधी गुंतवत (खर्च करत) आहेत.
भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित
नरेंद्र मोदी यांनी बुधवारी ट्रम्प यांच्याशी झालेल्या बैठकीत भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. इराण आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित असलेल्या शांतता करारात खलाशांच्या सुरक्षेसाठी विशेष तरतुदी असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.