संग्रहित छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

भारतावरील टॅरिफ कमी करण्याचे ट्रम्प यांचे संकेत

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामध्ये लक्षणीय प्रगती झाली असून दोन्ही देश कराराच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्याचे सूचक वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामध्ये लक्षणीय प्रगती झाली असून दोन्ही देश कराराच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्याचे सूचक वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर रशियाकडून तेलखरेदीच्या मुद्द्यावरून भारतावर लादण्यात आलेले कर कमी करण्याचे स्पष्ट संकेतही ट्रम्प यांनी दिले आहेत.

ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये टॅरिफची जगभरात मोठी चर्चा होत आहे. ट्रम्प यांनी आतापर्यंत दक्षिण अफ्रिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया, भारतासह अनेक देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादलेले आहे. ट्रम्प यांनी भारतावर जवळपास ५० टक्के ‘टॅरिफ’ लादलेले आहे. त्यामुळे भारताला मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

भारत रशियाकडून तेल आयात करत असल्याच्या मुद्यांवरूनही ट्रम्प यांनी अनेकदा टीका केली. तसेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद करण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले. मात्र, भारताने त्यावर कोणताही ठोस असा निर्णय घेण्यास नकार दिला. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामध्ये व्यापार करार होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप हा करार झालेला नाही.

सूचक वक्तव्य

या सर्व घडामोडीनंतर आता ट्रम्प यांनी एक मोठे भाष्य केले आहे. भारताबरोबरच्या व्यापार कराराच्या चर्चांबाबत बोलताना दोन्ही देशातील कराराच्या चर्चेत लक्षणीय प्रगती झाली असून दोन्ही देश कराराच्या जवळ असल्याचे सूचक वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. आम्ही भारताबरोबर एक करार करत आहोत, जो पूर्वी केलेल्या करारांपेक्षा खूप वेगळा असेल. कराराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. आपण एक निष्पक्ष व्यापार करार करणार आहोत. सध्या त्यांना (भारताला) माझ्यावर प्रेम नाही पण ते पुन्हा आमच्यावर प्रेम करतील आणि एक करार यशस्वी होईल, कारण ते खूप चांगले वाटाघाटी करणारे आहेत. पण ते (राजदूत सर्जियो गोर) तुम्हाला पाहावे लागेल, असे ट्रम्प म्हणाले.

गोर यांना शपथ

दरम्यान, ट्रम्प यांनी भारतातील अमेरिकेचे नवे राजदूत सर्जियो गोर यांना शपथ दिल्यानंतर सांगितले की, ते भारतासोबतची अमेरिकेची धोरणात्मक भागीदारी मजबूत करतील. भारत ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आणि एक महान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही त्यांची मैत्री आहे आणि राजदूत सर्जियो गोर ही मैत्री आणखी पुढे नेतील, असे म्हणत ट्रम्प यांनी व्यापार कराराचे संकेत दिले.

टॅरिफ कमी करणार

अमेरिका भारतीय आयातीवरील कर कमी करण्याचा विचार करेल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ट्रम्प म्हणाले की, सध्या रशियन तेलामुळे भारतावर कर खूप जास्त आहेत आणि त्यांनी रशियन तेल घेणे बंद केले आहे, किंवा ते खूप कमी केले आहे, हो, आम्ही कर कमी करणार आहोत, असे संकेत ट्रम्प यांनी दिले.

Mumbai : सँडहर्स्ट रोड रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? ५ दिवस उलटले तरी FIR नाही

मुंबईत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व माटुंगा विभागातील काही परिसरांना झळ बसणार

अचानक बेशुद्ध पडल्याने अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल

मुंबई मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का; राज्यातील २९ मनपांतील आरक्षण सोडत जाहीर, मुंबई महापालिकेत येणार महिलाराज

ठाणे महापालिकेत ‘महिलाराज’; ६६ महिलांना आरक्षणाचा लाभ, ३३ प्रभागांची रचना निश्चित