वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा निर्वाणीचा इशारा दिला. इराणने लवकरात लवकर शांतता करारावर स्वाक्षरी न केल्यास इराणचे वीज प्रकल्प, तेल विहिरी आणि खर्ग बेट अमेरिका उद्ध्वस्त करेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. होर्मूझची सामुद्रधुनी त्वरीत खुली करावी असेही त्यांनी पुन्हा एकवार बजावले आहे.
लष्करी कारवाया थांबवण्यासाठी आपले प्रशासन इराणशी गंभीर चर्चा करत असून ती सकारात्मक वळणावर आहे असे एकीकडे नमूद करतानाच त्यांनी हा ‘बोलहल्ला’ चढवला आहे.
ट्रम्प यांनी केवळ ऊर्जा क्षेत्रावरच नव्हे, तर इराणमधील समुद्री पाणी गोड करणाऱ्या प्रकल्पांवरही हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इराणने तातडीने लवचिक भूमिका न घेतल्यास त्यांना मोठ्या विनाशाला सामोरे जावे लागेल, असे संकेत त्यांनी दिले. ट्रम्प यांच्या या नव्या पवित्र्यामुळे युध्द आता कोणते वळण घेणार याची चिंता सर्व देशांना वाटू लागली आहे. मध्य-पूर्वेतील संघर्षाला एक महिना लोटला असून आतापर्यंत तीन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इराणनेही प्रत्युत्तर देत इस्राएल आणि शेजारच्या आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत.
नौदलप्रमुखाचा मृत्यू
दुबई : इराणच्या 'रिव्होल्युशनरी गार्ड'चे (आयआरजीसी) नौदलप्रमुख अलीरेझा टांगसिरी यांचा मृत्यू झाल्याचे इराणने सोमवारी अधिकृतपणे जाहीर केले. गेल्या गुरुवारी इस्रायलने केलेल्या एका हल्ल्यात रिअर ॲडमिरल टांगसिरी यांना ठार केल्याचा दावा केला होता.
सोमवारी इराणच्या सरकारी दूरचित्रवाणीवर रिव्होल्युशनरी गार्ड्सचे अधिकृत निवेदन वाचून दाखवण्यात आले. यामध्ये म्हटले आहे की, टांगसिरी हे गंभीर जखमी झाले होते आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. इराणने टांगसिरी यांच्या कार्याचा गौरव करताना विशेषतः 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' या महत्त्वाच्या सागरी मार्गावर इराणचे वर्चस्व कायम राखण्यातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.
प्रत्येक सैनिक टांगसिरी
इराणने आपल्या निवेदनात इस्रायलला इशारा देताना म्हटले आहे की, आमचा प्रत्येक सैनिक हा टांगसिरी आहे. येणाऱ्या काही दिवसांत आणि महिन्यांत आमचे सैन्य नेमकी काय 'सरप्राईज' देते, हे जगाला दिसेलच.
पेट्रोकेमिकल प्रकल्पावर हल्ला
दरम्यान, तेहरानपासून ५३० किमी वायव्येला असलेल्या एका पेट्रोकेमिकल प्रकल्पावर सोमवारी भीषण हल्ला झाला. सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर प्रकल्पाला मोठी आग लागली होती ती अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आहे. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आम्ही इराणमधील विविध प्रकल्पांना आतापर्यंत हात लावलेला नाही. इराणच्या जुन्या राजवटीने गेल्या जवळपास चार दशकांच्या आपल्या दहशतीच्या राजवटीत आमच्या अनेक सैनिकांची आणि इतरांची हत्या केली आहे, त्याचा हा बदला असेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकी लढाऊ विमानांना स्पेनचे आकाश बंद
माद्रिद : मध्य पूर्वेत गेल्या महिन्याभरापासून संघर्ष सुरु असून या युद्धात अमेरिकेच्या बाजूने अद्याप एकही युरोपियन देश उतरलेला नाही. आता स्पेनने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी निघालेल्या अमेरिकेच्या कोणत्याही लढाऊ विमानांना स्पेनची हवाई हद्द वापरता येणार नाही असे स्पेनने स्पष्ट केले आहे. स्पेन हा अमेरिकाप्रणीत नाटो या लष्करी करार गटाचा सदस्य आहे. मात्र त्याने युध्दामध्ये आरंभापासून ठामपणे ट्रम्पविरोधी भूमिका घेतली आहे. यापूर्वी आपल्या देशात असलेले लष्करी तळ वापरण्यापासून त्याने अमेरिकेला रोखले होते. आता इराणवर हल्ले करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अमेरिकेच्या विमानांसाठी आम्ही आमचं हवाई क्षेत्र बंद करत आहोत, अशी माहिती स्पेनच्या संरक्षण मंत्री मार्गरिटा रोबल्स यांनी सोमवारी दिली. यामुळे आता अमेरिकन विमानांना मध्य पूर्वेकडे जाताना वळसा घालून जावा लागेल. दरम्यान, आपत्कालीन स्थितींमध्ये मात्र अमेरिकेच्या लढाऊ विमानांना स्पेनची हवाई हद्द वापरता येईल, अशी माहिती 'एल पाईस' या स्पॅनिश वर्तमानपत्राने सैन्यातील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.