आंतरराष्ट्रीय

चार दिवस युद्धविराम हमास-इस्रायलमध्ये ओलिसांच्या सुटकेसाठी करार इस्रायलचे ५०, पॅलेस्टाइनचे १५० कैदी सोडणार

ओलिसांच्या सुटकेसाठी चार दिवस तात्पुरता युद्धविराम जाहीर झाला असला तरी हमासविरुद्धचे युद्ध संपलेले नाही.

नवशक्ती Web Desk

तेल अवीव : हमास आणि इस्रायल यांच्यात ओलिसांच्या सुटकेसाठी करार झाल्याची माहिती इस्रायलच्या वतीने बुधवारी देण्यात आली. त्यानुसार इस्रायल चार दिवस युद्धविराम घेणार आहे. या काळात हमास इस्रायलचे ५० ओलीस सोडेल. तर इस्रायल त्यांच्या ताब्यातील १५० पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करणार आहे. कतार, अमेरिका आणि इजिप्तच्या मध्यस्थीने हा करार झाला आहे.

या कराराची अंमलबजावणी नेमकी केव्हा सुरू होणार, याचे तपशिल मात्र जाहीर करण्यात आलेले नाहीत. गुरुवारी सकाळी १० वाजल्यापासून युद्धविरामाला सुरुवात होईल, असे हमासने म्हटले आहे. इस्रायलने त्यावर काही स्पष्टीकरण दिलेले नाही. इस्रायलने गाझा पट्टीत आणखी मदत सामग्री पाठवण्याची परवानगी देण्याची तयारी दाखवली आहे.

हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यावेळी इस्रायलच्या सुमारे २४० नागरिकांना बंदी बनवले होते. तर इस्रायलच्या ताब्यात गेल्या काही वर्षांपासून पॅलेस्टाइनचे सुमारे ७००० नागरिक आहेत. त्यात कट्टर दहशतवाद्यांपासून विविध आंदोलनांत इस्रायली पोलिसांवर दगडफेक करणारे तरुण आणि महिलांचाही समावेश आहे. यापैकी इस्रायलचे ५० ओलीस सोडण्यास हमास तयार झाले आहे. त्याच्या बदल्यात इस्रायल १५० पॅलेस्टिनींची मुक्तता करेल. दोन्ही बाजूंकडून मुक्त केल्या जाणाऱ्या नागरिकांत प्रामुख्याने महिला, मुले आणि वृद्धांचा समावेश आहे.

करारानुसार चार दिवस इस्रायलची सेनादले गाझा पट्टीवरील हल्ले थांबवणार आहेत. त्या वेळेत दररोज १० ते १२ इस्रायली ओलिसांची सुटका केली जाईल. हमासने इस्रायली ओलिसांची पहिली तुकडी सोडली की, इस्रायल त्यांच्या ताब्यातील काही कैदी सोडेल. या क्रमाने चार दिवसांत पहिल्या टप्प्यातील ओलिसांची अदलाबदली पूर्ण होईल. त्यानंतर हमास दररोज १० ओलिसांची सुटका करण्यास तयार झाले तर त्यासाठी आणखी एकेक दिवस युद्धविराम वाढवला जाईल. या ओलिसांच्या व्यतिरिक्त हमास त्यांच्या ताब्यातील थायलंडच्या काही ओलिसांची स्वतंत्रपणे सुटका करण्याची शक्यता आहे.

युद्ध अजून संपलेले नाही

ओलिसांच्या सुटकेसाठी चार दिवस तात्पुरता युद्धविराम जाहीर झाला असला तरी हमासविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. सर्व ओलिसांची सुटका करणे आणि हमास संघटना नेस्तनाबूत करणे, हे इस्रायलचे ध्येय आहे. त्यासाठी चार दिवसांच्या विरामानंतर पुन्हा युद्ध सुरू होईल, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे. पण, हमासने आणखी ओलिसांची सुटका करण्याची तयारी दाखवली तर एकेक दिवस युद्धविराम वाढू शकतो.

जनसुरक्षा नव्हे जनदडपशाही

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार