पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना तुरुंगात विष देऊन मारण्याच्या अफवा पाकिस्तानात पसरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक तुरुंगाबाहेर पोहोचले असता त्यांच्यावरही लाठीचार्ज केल्याचे समजते. खान यांना भेटण्यावर घातलेली बंदी आणि कुटुंबीयांनाही आत प्रवेश नाकारल्यामुळे नागरिकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राजकीय नेत्यांच्या भेटी नाकारल्या
रावळपिंडीतील आदियाला जेलमध्ये २०२३ पासून इम्रान खान कारावास भोगत आहेत. मात्र मागील काही आठवड्यांपासून त्यांच्याबाबत कोणतीही अद्ययावत माहिती बाहेर येत नाही. खान यांच्या कुटुंबीयांसह पक्षातील नेत्यांना देखील भेटीची परवानगी नाकारली जात असल्याचे पीटीआयने सांगितले. याच भेटीवरील निर्बंधांमुळे अफवांना आणखी खतपाणी मिळत आहे.
खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल आफ्रिदी यांनी सलग ७ वेळा भेटीचा प्रयत्न केला, तरीही तुरुंग प्रशासनाने त्यांना प्रवेश नाकारला, अशी माहिती समोर आली आहे.
बहिणीवर पोलिसांचा लाठीहल्ला
इम्रान खान यांच्या बहिणी नुरीन नियाझी आणि इतर कुटुंबीय तुरुंगाबाहेर शांततापूर्ण आंदोलन करत असताना पोलिसांनी अचानक लाठीचार्ज केल्याचा पीटीआयचा गंभीर आरोप आहे. ७१ वर्षीय नुरीन नियाझी यांना केसांनी ओढत रस्त्यावर ओढलं, इतर महिलांनाही मारहाण करण्यात आली, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
नुरीन नियाझी यांनी पंजाब (पाकिस्तानस्थित) पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी आणि तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. “गेल्या तीन वर्षांत शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर पोलिस अत्याचार वाढले आहेत,” असे त्यांनी पत्रात लिहिले आहे.
अफवा की सत्य?
सोशल मीडियावर काही अकाउंट्स इम्रान खान यांचा मृत्यू किंवा विषप्रयोग झाल्याचे दावे करत आहेत. पाकिस्तानात या दाव्यांमुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. अधिकृत स्तरावर मात्र कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही, त्यामुळेच नागरिकांत संशय अधिक गडद होत आहे. खान यांच्या भेटींवर अचानक आलेल्या निर्बंधांमुळे, सुरक्षा दलांकडून कुटुंबीयांवर झालेल्या कथित मारहाणीमुळे आणि प्रशासनाच्या मौनामुळे या प्रकरणावर अधिक प्रश्न उपस्थित होत आहेत.