माले: भारत मालदीवसोबत आपले संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तयार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या मालदीव दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री उपस्थित होते. मोदी यांनी मालदीवचे उपराष्ट्रपती हुसैन मोहम्मद लतीफ यांच्यासहित देशाच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली.
पंतप्रधान मोदी शनिवारी मालदीवच्या ६० व्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यामुळे काही काळापासून सुरू असलेल्या अस्वस्थतेनंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये नव्याने गती आल्याचे संकेत मिळत आहेत.
मोदी म्हणाले की, भारत, मालदीवसोबत आपली भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी उत्सुक आहे. मालदीवमध्ये पायाभूत सुविधांसाठी मदत करण्यासाठी भारत तयार आहे.
मालदीवच्या राजधानीच्या मध्यभागी असलेल्या प्रतिष्ठित रिपब्लिक स्क्वेअरवर राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी मोदींचे स्वागत केले.
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू म्हणाले की, मालदीवच्या विकासात भारताची भूमिका महत्त्वाची आहे. भारताने यापूर्वी मालदीवची मदत केली आहे. भविष्यातही भारत मालदीवचा मोठा भागीदार असेल. पर्यटन क्षेत्रात भारत हा मालदीवला मदत करतो. मोदी यांच्या प्रवासामुळे भारतातून मालदीवच्या पर्यटनाला मोठी गती मिळेल. तसेच दोन्ही देशांच्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात आदानप्रदान होईल, असे ते म्हणाले.
'ग्लोबल लीडर अप्रुव्हल रेटिंग'मध्ये मोदी अव्वल
वॉशिंग्टन : डेमोक्रेटिव ग्लोबल लीडरअप्रुव्हल रेटिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अव्वल क्रमांक मिळाला आहे. त्यांना ७५ टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळाली. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यंग हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्यंग यांनाही ७५ टक्के अप्रुव्हल रेटिंग मिळाले आहे.