Indonesia Factory Fire : इंडोनेशियातील कँडी कारखान्यात भीषण अग्नितांडव; ३ जणांचा मृत्यू, ३६ कामगार बेपत्ता, Video (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
आंतरराष्ट्रीय

Indonesia Factory Fire : इंडोनेशियातील कँडी कारखान्यात भीषण अग्नितांडव; ३ जणांचा मृत्यू, ३६ कामगार बेपत्ता, Video

आग लागून १२ तासांहून अधिक काळ उलटला तरी कारखान्याच्या काही भागांत आग धुमसत असल्याने बचावकार्य सुरू आहे. बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांचा कारखान्याबाहेर चिंताग्रस्त अवस्थेत शोधकार्याच्या बातमीकडे डोळा लागला आहे.

किशोरी घायवट-उबाळे

जकार्ता : इंडोनेशियातील एका कँडी कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत मोठी दुर्घटना घडली आहे. बँटन प्रांतातील सेरांग जिल्ह्यात असलेल्या या कारखान्याला शनिवारी (दि. २१) आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, ३६ कामगार बेपत्ता आहेत. दरम्यान, १५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. आग लागून १२ तासांहून अधिक काळ उलटूनही कारखान्याच्या काही भागांत आग धुमसत असल्याने अग्निशमन दल आणि बचाव पथकांकडून शोधमोहीम सुरू आहे. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान बचाव पथकांसमोर आहे.

तीन मजली कँडी कारखान्याला भीषण आग

मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियातील बँटन प्रांतातील सेरांग जिल्ह्यात असलेल्या पीटी फोनुसा अगुंग मुलिया (PT Fonusa Agung Mulia) या कारखान्याला शनिवारी आग लागली. हा कारखाना मिल्किटा (Milkita) या इंडोनेशियातील प्रसिद्ध ब्रँडच्या दूधापासून बनवलेल्या कँडी आणि स्नॅक्सची निर्मिती करतो. आगीने काही वेळातच कारखान्याच्या मोठ्या भागाला वेढा घातला. तीन मजली इमारतीतून काळ्या धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे दृश्य समोर आले आहे.

१२ तासांहून अधिक काळ अग्निशमन दलाची झुंज

आगीची तीव्रता लक्षात घेता सेरांग जिल्हा आणि बँटन प्रांतातील अग्निशमन दलाच्या पथकांना बोलवण्यात आले. बँटन बचाव आणि शोध संस्थेचे अधिकारी रिझकी द्वियांतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्याच्या अनेक भागांत आग अजूनही धुमसत होती. त्यामुळे आग विझवण्यासोबतच इमारतीतील तापमान कमी करण्याचं कामही सुरू होते. आग लागल्यानंतर १२ तासांहून अधिक काळ उलटूनही अग्निशमन दलाची झुंज सुरू होती.

१५ कामगारांची सुटका, ३६ जणांचा शोध सुरू

राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी चार कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, आणखी ३६ कामगारांचा ठावठिकाणा लागलेला नाही. बचाव पथकाकडून कारखान्याच्या वेगवेगळ्या भागांची तपासणी केली जात असून, ढिगाऱ्याखाली किंवा इमारतीत अडकलेल्या कामगारांचा शोध घेतला जात आहे.

बेपत्ता कामगारांच्या कुटुंबीयांची कारखान्याबाहेर प्रतीक्षा

कारखान्याबाहेर बेपत्ता कामगारांचे नातेवाईक चिंतेत आहेत. आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क होत नसल्याने ते बचावकार्याच्या प्रत्येक अपडेटची वाट पाहत आहेत. या शोधमोहिमेत स्थानिक अग्निशमन दलासोबत इंडोनेशियन रेडक्रॉसचे पथकही सहभागी झाले आहे.

कूलिंग युनिटमधून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कारखान्यातील काही कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या मजल्यावरील कूलिंग युनिटमधून आगीला सुरुवात झाली असावी. प्रशासनाने अद्याप आगीचं अधिकृत कारण जाहीर केलेले नाही. तसेच, आग लागली तेव्हा बेपत्ता असलेले सर्व कामगार कारखान्यातच होते का, याचीही खात्री झालेली नाही.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भेसळयुक्त दुधाचा दैनंदिन पुरवठा २० लाख लिटरने घटला; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दावा

Pune Metro : पुणेकरांचा प्रवास रखडला; तांत्रिक बिघाडामुळे काही काळ मेट्रो ठप्प, रामवाडी स्थानकात प्रवाशांची गर्दी, VIDEO

Rajasthan Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; महाराष्ट्रातल्या एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू, ६ जखमी

Mumbai : उघडी मॅनहोल बंदिस्त होणार; ४०० चौरस मीटर क्षेत्रातील मॅनहोलवर नवीन झाकणे, BMC १ कोटी १० लाख रुपये खर्च करणार

झोपेचं सोंग घेऊन महिलेशी अश्लील चाळे; जाग येताच महिलेने लगावली थप्पड, रुग्णालयातील VIDEO व्हायरल