लंडन : ‘केन अँड एबल’सह अनेक गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखक आणि ब्रिटनचे वादग्रस्त माजी राजकारणी जेफ्री आर्चर यांचे निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. सोमवारी राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अखेरच्या ‘ॲडम अँड ईव्ह’ या कादंबरीचे जागतिक प्रकाशन होण्याच्या एक दिवसआधीच त्यांचे निधन झाले.
आर्चर यांचे साहित्यिक आणि राजकीय जीवन यश आणि वादांनी भरलेले होते. राजकीय कारकीर्दीला खीळ बसल्यानंतरही त्यांनी लेखन सुरू ठेवले आणि तुरुंगवास भोगल्यानंतर पुन्हा साहित्यविश्वात आणि राजकारणात पुनरागमन केले. त्यांची लेखन कारकीर्द सुमारे पाच दशके चालली.
आर्थिक अडचणींनंतर १९७६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ या पहिल्याच कादंबरीने त्यांना लेखक म्हणून ओळख मिळवून दिली. आर्चर यांची पुस्तके जगभरात ३० कोटींहून अधिक प्रतींमध्ये विकली गेली. त्यांच्या पुस्तकांनी ब्रिटनच्या ‘संडे टाइम्स’च्या बेस्टसेलर यादीत एकूण १४ वर्षे पाच महिने, तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बेस्टसेलर यादीत पाच वर्षांहून अधिक काळ स्थान मिळवले.