बिश्नोई टोळीला मोठा धक्का! जवळचा साथीदार हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टी, रणवीर सिंहला धमकी दिल्याचा आरोप  (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

बिश्नोई टोळीला मोठा धक्का! जवळचा साथीदार हॅरी बॉक्सर अमेरिकेत अटकेत; रोहित शेट्टी, रणवीर सिंहला धमकी दिल्याचा आरोप

Lawrence Bishnoi Gang : आवाजातील तफावतीमुळे फोन करणाऱ्या व्यक्तीने बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे खोटे सांगितले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असलेल्या हरी चंद जाट ऊर्फ हॅरी बॉक्सर याला अमेरिकेत अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. अमेरिकेतील इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) या यंत्रणेने त्याला कॅलिफोर्नियामध्ये ताब्यात घेतले. चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराची जबाबदारी हॅरी बॉक्सरने स्वीकारली होती. तसेच अभिनेता रणवीर सिंह आणि रोहित शेट्टी यांना खंडणीसाठी धमकी दिल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. या कारवाईमुळे बिश्नोई टोळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

तुषार कपूरला आलेल्या धमकीच्या फोनमध्येही हॅरी बॉक्सरचे नाव

अभिनेता तुषार कपूरला पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करणारा धमकीचा फोन आल्याचे प्रकरण अलीकडेच समोर आले होते. या फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर अशी करून दिली होती. तसेच आपण लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावाही केला होता. या प्रकरणाचा मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

तुषार कपूरने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आले. तपासादरम्यान धमकीच्या फोनचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले. फोन करणाऱ्या व्यक्तीच्या आवाजाची तुलना हरी बॉक्सरच्या उपलब्ध आवाजाच्या नमुन्यांशी करण्यात आली. मात्र, प्राथमिक विश्लेषणात दोन्ही आवाज जुळले नसल्याचे वृत्त आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आवाजातील तफावतीमुळे फोन करणाऱ्या व्यक्तीने बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचे खोटे सांगितले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. टोळीच्या नावाचा वापर करून अभिनेत्याला घाबरवणे आणि खंडणी उकळणे हा यामागील उद्देश असू शकतो, असा तपास यंत्रणांना संशय आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि फोनचे नेमके ठिकाण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकरणात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नसल्याचे वृत्त आहे. अभिनेता टायगर श्रॉफशी संबंधित जुहू येथील गोळीबाराच्या घटनेचाही मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंहला धमकी दिल्याचा आरोप

हॅरी बॉक्सरवर अभिनेता रणवीर सिंह आणि चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीला व्हॉइस मेसेजच्या माध्यमातून धमक्या दिल्याचा आरोप आहे. या दोघांकडे २० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचे वृत्त आहे. या धमकीच्या व्हॉइस नोटचे प्राथमिक न्यायवैद्यक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीचा आवाज हॅरी बॉक्सरच्या आवाजाशी जुळल्याचे वृत्त समोर आले आहे.

गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हॅरी बॉक्सरचे नाव

मिळालेल्या वृत्तानुसार, राजस्थान, पंजाब आणि दिल्लीतील अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्याचे नाव जोडले गेले आहे. कॅनडातील सरे येथे १७ ऑक्टोबर २०२५ रोजी विनोदी कलाकार कपिल शर्मा यांच्या 'कॅप्स कॅफे'वर झालेल्या गोळीबाराच्या घटनेतही त्याचे नाव समोर आले होते.

हॅरी बॉक्सरचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी भारतीय अधिकारी संबंधित केंद्रीय तपास यंत्रणांशी समन्वय साधत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर भारतातील तपास यंत्रणांकडून पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे लक्ष दिले जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध! अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नि:संदिग्ध ग्वाही

Mumbai : बेस्ट बसमध्ये आता सुट्ट्या पैशांची कटकट संपणार? QR कोड स्कॅन करून तिकीट काढण्याचा प्रस्ताव

MTNL च्या मालमत्तेची विक्री; सरकार ९ हजार कोटींच्या मालमत्तेबाबत पुढील आर्थिक वर्षात अंमलबजावणी करणार

टोरंट हटाव, सह्याद्री बचाव! कर्जतमध्ये आदिवासी समाजाचा एल्गार

Tiger Shroff Firing Case : ‘त्या’ आरोपीचे वय तपासा! मकोका न्यायालयाचे पोलिसांना आदेश