लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय  
आंतरराष्ट्रीय

लॉरेन्स बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय, टोळीसोबत व्यवहार केल्यास होणार शिक्षा

कॅनडा सरकारने भारतातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. कॅनडाने बिश्नोई गँगला अधिकृतरीत्या दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.

नेहा जाधव - तांबे

कॅनडा सरकारने भारतातील कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. कॅनडाने बिश्नोई गँगला अधिकृतरीत्या दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. सोमवारी (दि. २९) सार्वजनिक सुरक्षा मंत्री गॅरी आनंदसांगरी यांनी या संदर्भात घोषणा केली.

हिंसाचार आणि दहशतवादाविरोधात कठोर पवित्रा

कॅनडा सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंसाचार आणि दहशतवादाच्या कृत्यांना कॅनडामध्ये कोणतेही स्थान नाही. विशेषतः विशिष्ट समुदायांना लक्ष्य करून भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कृत्यांना आम्ही कधीच मान्यता देणार नाही. याच पार्श्वभूमीवर बिश्नोई गँगला कॅनडाच्या फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून सूचीबद्ध करण्यात आले आहे.

कॅनडाच्या कारवाईचे परिणाम

या निर्णयामुळे कॅनडातील बिश्नोई टोळीशी संबंधित संपत्ती, पैसे, वाहने आणि इतर मालमत्ता गोठवणे किंवा जप्त करणे शक्य होणार आहे. तसेच कायदा अंमलबजावणी संस्थांना टोळी सदस्यांवर अटक, चौकशी आणि खटले चालवण्याचे अधिक अधिकार मिळतील. कॅनडामधील कोणत्याही व्यक्तीने या गटाच्या मालकीच्या वस्तूंशी व्यवहार करणे किंवा आर्थिक मदत करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा मानला जाईल. इमिग्रेशन कायद्यांतर्गत, अशा दहशतवादी गटाशी संबंधित व्यक्तींना कॅनडामध्ये प्रवेश देखील नाकारला जाऊ शकतो.

भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गुन्हे

लॉरेन्स बिश्नोई गँगवर भारतात आणि बाहेर अनेक गुन्हे दाखल आहेत. यात खंडणी, खून, शस्त्रास्त्रांची तस्करी, अंमली पदार्थांचा व्यापार यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कॅनडियन पोलिसांनी बिश्नोई गँगवर आरोप केला होता की, भारतातून या टोळीच्या माध्यमातून कॅनडामधील नागरिकांवर, विशेषतः खलिस्तान समर्थकांना लक्ष्य करून हल्ले आणि खंडणीची कामे केली जात आहेत.

लॉरेन्स बिश्नोई कोण आहे?

लॉरेन्स बिश्नोई मूळचा पंजाबमधील फिरोजपूर येथील एका गावात झाला. त्याने शालेय शिक्षण अबोहार येथे घेतले. पुढे तो शिक्षणासाठी चंदीगढला गेला. विद्यार्थी जीवनात त्याला ॲथलेटिक्सची आवड होती, विशेषतः १५०० मीटर शर्यतीत तो सक्रिय होता. पण महाविद्यालयीन काळातच त्याचा गुन्हेगारीशी परिचय झाला. २०११-१२ मध्ये तो विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झाला. मात्र, या काळात तो अनेक गुन्ह्यांत अडकला. राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि चंदीगढ परिसरात वर्चस्व निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवून त्याने टोळी स्थापन केली. छोट्या गुन्ह्यांपासून सुरुवात करून खंडणी, हल्ले आणि हत्या अशा मोठ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग वाढत गेला.

कॅनडा सरकारने स्पष्ट केलं आहे की, "ज्यांच्या कृतींमुळे दहशत आणि हिंसाचार पसरतो, अशा संघटनांना कॅनडामध्ये स्थान नाही." या निर्णयामुळे बिश्नोई गँगच्या आंतरराष्ट्रीय हालचालींना मोठा धक्का बसणार आहे.

Maharashtra HSC Exam 2025 : पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बारावीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

एका रात्रीत ३७ गायी, २० शेळ्यांचा बळी! पुरामुळे दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त; धाराशिवच्या शेतकऱ्याचे ६० लाखांचे नुकसान, मदत अपुरी

वैष्णवी हगवणे प्रकरण : सासू-नणंदेचा पुणे न्यायालयाने फेटाळला जामीन; म्हणाले, "नऊ महिन्यांच्या बाळाची आई...

महाराष्ट्रात पावसाचे संकट; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विशेष अधिवेशनाची मागणी

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय