लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू (Photo-X)
आंतरराष्ट्रीय

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

London Indian Origin Man Stabbed To Death : लंडन ॲम्ब्युलन्स सर्व्हिसकडून चाकूहल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

किशोरी घायवट-उबाळे

लंडनमधील साऊथॉल परिसरात भीषण घटना घडली असून नॉर्थ रोडवर २६ वर्षीय गुरभेज सिंग हा भारतीय वंशाचा तरुण रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. मध्यरात्री घडलेल्या या चाकूहल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

लंडन ॲम्ब्युलन्स सर्व्हिसकडून चाकूहल्ल्याची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पॅरामेडिक्सचे शर्थीचे प्रयत्न; घटनास्थळीच मृत घोषित

माहितीनुसार, पॅरामेडिक्सने (वैद्यकीय पथक) गुरभेज सिंग याचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने उपचार सुरू केले. मात्र गंभीर जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्याला घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले.

त्याचवेळी घटनास्थळी आणखी एक ३० वर्षीय पुरुष जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दुकानाबाहेर हल्ला; पोलिसांचा प्राथमिक अंदाज

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, नॉर्थ रोड आणि डॉर्मर्स वेल्स लेनच्या जंक्शनजवळील एका दुकानाबाहेर रात्री साधारण १२:३० च्या सुमारास हा चाकूहल्ला झाला असावा.

हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण साऊथॉल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

याप्रकरणी पोलिसांनी २० ते ३० वयोगटातील सात जणांना हत्येच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर सहा जणांना कोणतीही पुढील कारवाई न करता सोडून देण्यात आले आहे. तर एका आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला असून, त्याला पुढील चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

डिटेक्टिव्ह चीफ इन्स्पेक्टर अ‍ॅलिसन फॉक्सवेल यांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी माहिती देण्यासाठी पुढे यावे किंवा हल्ल्याशी संबंधित कोणतेही सीसीटीव्ही फुटेज असल्यास ते पोलिसांकडे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

कुटुंबासाठी मदतीसाठी फंडरेझर सुरू

गुरभेज सिंगचा मृतदेह भारतात आणण्यासाठी तसेच अंत्यसंस्कार आणि इतर खर्चांसाठी GoFundMe मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याद्वारे आर्थिक सहाय्य गोळा केले जात असून मित्र आणि समर्थकांनी नागरिकांना या मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai : राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दुचाकीस्वारांना भेट; पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

बनावट दाखल्यांचा घोटाळा उघडकीस; महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

Mumbai : कंत्राटदारांना त्रुटींसाठी ९ कोटींचा दंड; एआयने लावला छडा