वॉशिंग्टन : मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील वापरकर्त्यांना शुक्रवारी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे जगभरातील विमान कंपन्या, दूरचित्रवाहिन्या, बँकिंग आणि अनेक कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. अमेरिका, ब्रिटन आणि भारतासह अनेक देशांमध्ये जवळपास १४०० उड्डाणे रद्द करण्यात आली आणि ३ हजार विमाने उशिराने उडाली. ‘मायक्रोसॉफ्ट ३६५’ची सर्व्हिस ठप्प होण्यामागे ‘क्राऊड स्ट्राइक’मधील एक अपडेट असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या बिघाडामागचे कारण आम्ही शोधले असून त्यावर काम करीत असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.
अनेकांचे संगणक आणि लॅपटॉप अचानक बंद पडले आणि त्यावर निळ्या रंगाचा पडदा दिसू लागला. यामुळे जगभरातील कंपन्यांची कामे खोळंबली.
भारतात इंडिगो, स्पाईसजेट, आकासा एअर, विस्तारा आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या ५ एअरलाइन्सनी या तांत्रिक समस्येमुळे त्यांचे बुकिंग, चेक-इन आणि फ्लाइट अपडेट सेवा प्रभावित झाल्याचे सांगितले. यामुळे विमानतळावर नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत अनेक वापरकर्त्यांनी याबाबत तक्रार केली. काम करत असताना अचानक त्यांचे लॅपटॉप बंद पडत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच तुमचा संगणक अडचणीत असून रिस्टार्ट करणे आवश्यक आहे, असे संदेश स्क्रीनवर येत असल्याचेही या यूजर्सनी सांगितले. ‘क्राऊड स्ट्राइक अपडेट’नंतर येत आहे, ही समस्या येत असल्याची तक्रारही काही यूजर्सद्वारे करण्यात आली आहे.
समस्येचे कारण शोधल्याचे मायक्रोसॉफ्टचे म्हणणे
मायक्रोसॉफ्टच्या अझुर क्लाऊड आणि मायक्रोसॉफ्टच्या ३६५ सेवांमध्ये समस्या आल्या आहेत. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, आम्हाला या समस्येची जाणीव आहे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी अनेक टीम्स तैनात केल्या आहेत. आम्ही या समस्येचे कारणही शोधले आहे.
भारतीय वेळेनुसार दुपारी साधारण १२.३० दरम्यान मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाला. मायक्रोसॉफ्टने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात निर्माण झालेली ही समस्या बॅकएंड वर्कलोड्सच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल केल्यामुळे झाली. ज्यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर रिसोर्सेसमध्ये अडथळे निर्माण झाले. क्राऊड स्ट्राइकने या प्रकरणाची दखल घेत समस्येची चौकशी सुरू केली आहे.
मायक्रोसॉफ्ट विंडोजमधील या समस्येचा प्रभाव कंपनीच्या अनेक सेवांवर पडला आहे. वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट ३६०, मायक्रोसॉफ्ट विंडोज, मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट स्टोअर आणि मायक्रोसॉफ्ट क्लाऊड-पावर्ड सेवांमध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे. शुक्रवारी क्लाऊड सेवा विस्कळीत झाल्यामुळे जगभरातील अनेक भागांत समस्या निर्माण झाल्या आहेत.
या समस्येमुळे अनेक देशांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. मायक्रोसॉफ्टने यावर काम करत असल्याचे म्हटले असून काही सेवा हळूहळू पूर्ववत होत असल्याचे सांगितले आहे.
क्राऊड स्ट्राइक ही सायबर सुरक्षा कंपनी आहे. ती जगभरातील बहुतेक संगणक आणि लॅपटॉपसाठी प्रगत सायबर सुरक्षा उपाय प्रदान करत. ती सर्व प्रकारचे सायबर हल्ले रोखते. क्राऊड स्ट्राइक ही कंपनी विंडोज कॉम्प्युटर्ससाठी ॲडव्हान्स्ड सायबर संरक्षण उपाय प्रदान करते आणि फाल्कन हे क्राऊड स्ट्राइकचे मुख्य प्रॉडक्ट आहे. फाल्कनमधील तांत्रिक बिघाडामुळे हे आऊटेज निर्माण झाले आहे. कंपनीचे फाल्कन उत्पादन नेटवर्कवर दुर्भावनापूर्ण किंवा व्हायरसयुक्त फायली शोधते. हे दुर्भावनापूर्ण फाइल्स शोधण्यासाठी आणि व्हायरस थांबवण्यासाठी एआय तंत्रज्ञान वापरते. फाल्कन सिस्टीम ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन असो, एंडपॉइंट सुरक्षा करू शकते.
क्राऊड स्ट्राइककडून निवेदन जारी
क्राऊड स्ट्राइकने यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. आम्ही या तक्रारींची माहिती घेत असून जोपर्यंत पुढील सूचना येत नाही, तोपर्यंत यूजर्सनी वाट बघावी, असे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच विंडोजवर चालणाऱ्या संगणकांमध्ये बीएसओडीची समस्या निर्माण झाली असून यूजर्सनी स्वत:हून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
विमान व बॅँकिंग सेवा प्रभावित
मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत झालेल्या या बिघाडाचा फटका भारतासह जगभरातील बँका, विमान सेवा, माध्यम समूह आणि कंपन्यांना बसला आहे. मुंबईसह देशभरातील अन्य काही महत्त्वाच्या विमानतळांवर सर्व्हर ठप्प झाल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्पाइस जेटनेही विमानसेवा ठप्प झाल्याचे म्हटले आहे. विमानसेवेबरोबरच बँकांचे व्यवहारदेखील ठप्प झाले होते.