काठमांडू : नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे मोठी हानी झाली असून किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. रसुवा, नुवाकोट आणि धादिंग जिल्ह्यांना या पुराचा मोठा फटका बसला असून, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता असल्याची माहिती आहे. बुधवारी (दि. २६) सकाळी अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे घरे, वाहने, पूल आणि पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले असून, नेपाळ लष्कर आणि सुरक्षा दलांकडून बचावकार्य सुरू आहे.
तिबेट सीमेजवळून आला पाण्याचा लोंढा
स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९ वाजता भोटे कोशी नदीला अचानक पूर आला. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाण्याचा प्रचंड लोंढा चीनच्या सीमेकडून अचानक आला. या पुराचा रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसराला मोठा फटका बसला.
पुराचे पाणी पुढे त्रिशूली नदीत गेल्याने नुवाकोटसह नदीच्या खालच्या प्रवाहातील भागांमध्येही पाणी शिरले. अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहने, घरे, मालसामान आणि इतर मालमत्ता वाहून गेली.
६० घरे वाहून गेल्याची माहिती
पुरामुळे रसुवा आणि नुवाकोटमधील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुवाकोटमधील त्रिशूली बाजाराजवळील सुमारे ६० घरे वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्रिशूली नदीवरील दोन पूलही नुकसानग्रस्त झाले किंवा वाहून गेले.
काही जलविद्युत आणि वीज प्रकल्पांनाही पुराचा फटका बसला. रसुवागढी, चिलिमे, त्रिशूली ३ए आणि देवीघाट यांसह सहा प्रमुख जलविद्युत व वीज वहन प्रकल्पांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. तसेच, रस्ते, बाजारपेठा, पोलीस चौक्या आणि अन्य सार्वजनिक सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सुरक्षा दलातील कर्मचारीही बेपत्ता
पूरग्रस्त आणि दुर्गम भागांत बचावकार्य सुरू असल्याने बेपत्ता व्यक्तींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. तिमुरे येथील सीमा चौकीवर तैनात असलेले सशस्त्र पोलीस दलाचे नऊ कर्मचारी अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेपाळ पोलीस आणि इतर सुरक्षा दलातील काही कर्मचारी तसेच रसुवा सीमाशुल्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य
नेपाळ लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस यांच्याकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी चार लष्करी आणि आठ खासगी अशा एकूण १२ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे.
रसुवातील विविध पूरग्रस्त भागांतून किमान १२ नागरिकांना हवाई मार्गाने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तर सात जखमींना लष्करी हेलिकॉप्टरच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
आपत्तीची परिस्थिती आणि सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेण्यासाठी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. नदीकाठच्या आणि खालच्या प्रवाहातील भागांत राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुराचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
भोटे कोशी नदीला अचानक आलेल्या महापुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुराचा उगम चीनच्या बाजूकडून झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तिबेट भागातील हिमनदी सरोवर फुटल्यामुळे पूर आला की अतिवृष्टीमुळे पाण्याचा लोंढा निर्माण झाला, याचा तपास सुरू आहे. नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाने भोटे कोशी आणि त्रिशूली नदीच्या खालच्या प्रवाहातील नागरिकांना उच्च सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतातही सतर्कता
नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतातही सतर्कता वाढवण्यात आली आहे. बिहारमध्ये गंडक नदीच्या संभाव्य वाढत्या पाणीपातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही नेपाळमधील परिस्थितीचा परिणाम लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या आणि पूरस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.