काठमांडू : नेपाळच्या पूरग्रस्त रसुवा आणि नुवाकोट जिल्ह्यांतील नऊ जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये ५३७ कामगार आणि कर्मचारी अद्याप अडकून पडले आहेत. दरम्यान, चिखल आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे बंद झालेल्या बोगद्यांमधील कामगारांना वाचवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
बोगद्यांच्या प्रवेशद्वारांवर साचलेला चिखल व मातीचा ढिगारा, पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान, कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल वातावरण यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. त्यामुळेच नेपाळने भारत, चीन आणि इतर देशांकडे विशेष मदतीची मागणी केली आहे.
‘इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ नेपाळ’च्या (आयपीपीएएन) माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी आलेल्या पुरानंतर या दोन जिल्ह्यांतील नऊ जलविद्युत प्रकल्पांमधील ८९८ कामगार आणि कर्मचाऱ्यांशी सुरुवातीला संपर्क होऊ शकला नव्हता.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी ‘आयपीपीएएन’ चा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, त्यापैकी ३६१ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून ५३७ जण अजूनही अडकून पडले असावेत.
‘नेपाळ न्यूज’ या वेब पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त प्रकल्प स्थळापर्यंत पोहोचणे सोपे जावे यासाठी नेपाळी सैन्याने एक्स्कॅव्हेटर आणि बुलडोझरचे सुटे भाग करून ते हेलिकॉप्टरद्वारे बत्तार, नुवाकोट येथे पोहोचवले.
सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संयुक्त बचाव पथके २४ तास काम करत असून बोगद्याच्या प्रवेशद्वारावर लवकरच महत्त्वाचे यश मिळण्याची शक्यता आहे.
बचावकर्त्यांनी बोगद्याच्या वरील भागातून आतील परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी छिद्र पाडून त्यातून कॅमेरा आणि ऑक्सिजन पाठवण्यास सुरुवात केली आहे.
२२ मेगावॉटच्या चिलिमे जलविद्युत प्रकल्पातील आठ जणांशी संपर्क होऊ शकलेला नाही, तर ६ कर्मचारी बोगद्यात अडकल्याची शक्यता प्रकल्प अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबुराजा महर्जन यांनी 'ऑनलाइनखबर' या न्यूज पोर्टलला सांगितले की, ‘सिमरिक एअर’च्या हेलिकॉप्टरने शनिवारी घटनास्थळी पोहोचलेल्या गिर्यारोहण बचाव पथकाने बोगद्यात प्रवेश केला, परंतु चिखलामुळे रस्ता पूर्णपणे बंद असल्याने त्यांना केवळ १०० मीटरपर्यंतच पुढे जाता आले.
हा अडथळा दूर करून अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य उपकरणांसह विशेष मोहिमेची आवश्यकता असल्याचे बचाव पथकाने सांगितले, असे महर्जन यांनी नमूद केले.
भारतीय तांत्रिक पथकाने केली बोगद्यांची पाहणी
दरम्यान, नेपाळच्या बोगद्यातील बचाव कार्यात मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मदत तैनात करण्यात आली आहे. काठमांडू येथील भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि बोगदा अभियंत्यांचा समावेश असलेल्या ११ सदस्यांच्या भारतीय तांत्रिक पथकाने शनिवारी पूरग्रस्त भागातील जलविद्युत बोगद्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. हे पथक शुक्रवारी काठमांडूमध्ये दाखल झाले होते आणि शनिवारी नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशूली येथे पोहोचले.
नेपाळी अधिकारी आणि भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, या पथकाने बचाव कार्यासाठी जागांची पाहणी करण्यापूर्वी चिलिमे आणि लांगटांग भागाचे हवाई सर्वेक्षणही केले.
चीनच्या बोगदा तज्ज्ञांचे पथकही दाखल
विशेष बचाव कार्यासाठी नेपाळने चीनी आणि दक्षिण कोरियन पथकांनाही मदत करण्याची परवानगी दिली असल्याचे अहवालात म्हटले आहे. बचाव कार्यात मदत करण्यासाठी चीनच्या बोगदा तज्ज्ञांचे सहा सदस्यांचे पथकही नेपाळमध्ये दाखल झाले आहे, असे त्यांनी सांगितले. 'चायना रेल्वे' कंपनी या प्रकल्पातील नागरी बांधकामाचे काम करत असून, या कंपनीच्या समन्वयाने हे तज्ज्ञ दाखल झाले आहेत. तथापि, चिनी पथकाला ‘अपर त्रिशूली-३ बी’ जलविद्युत प्रकल्पातील बचाव कार्यात मदतीसाठी स्वतंत्रपणे तैनात करण्यात आले आहे. ‘द हिमालयन टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, चिनी तज्ज्ञ हेलिकॉप्टरने त्रिशूली भागात पोहोचले असून बोगद्याची पाहणी करण्यासाठी आणि बचाव कार्याची शक्यता निश्चित करण्यासाठी नेपाळी सैन्याच्या तांत्रिक पथकाशी समन्वय साधत आहेत.
सर्वात गंभीर परिस्थिती रसुवा येथील २१६ मेगावॉट क्षमतेच्या ‘अपर त्रिशुली-१’ जलविद्युत प्रकल्पाची आहे, जिथे प्रकल्पाच्या बोगद्यात अद्याप ३०० कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नुवाकोट येथील ६० मेगावॉटच्या ‘अपर त्रिशुली-३ ए’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याचे प्रवेशद्वार चिखल आणि ढिगाऱ्याखाली दबले गेले होते, मात्र तेथे बचावकार्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे.
मृतांची संख्या ७८८ वर
काठमांडू: नेपाळमध्ये विनाशकारी पुरानंतर रविवारी भोटेकोशी नदीच्या पाण्याच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांतील नागरिक आणि बचाव पथकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय आपत्ती जोखीम कपात आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरातील मृतांची संख्या रविवारी ७८८ वर पोहोचली असून २५०० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. डीएनए विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारतातील फॉरेन्सिक तज्ज्ञांचे १८ सदस्यांचे पथक नेपाळमध्ये दाखल झाले असून दोन्ही देशांमधील समन्वय सुरू असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.