नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; माऊंट एव्हरेस्टजवळ लँडिंगवेळी मोठी दुर्घटना, एका भारतीयाचा मृत्यू, थरारक Video व्हायरल  (X - व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
आंतरराष्ट्रीय

नेपाळमध्ये दोन हेलिकॉप्टरची भीषण धडक; माऊंट एव्हरेस्टजवळ लँडिंगवेळी मोठी दुर्घटना, एका भारतीयाचा मृत्यू, थरारक Video व्हायरल

Nepal Helicopter Accident : या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये काही पर्यटक हेलिकॉप्टर उतरण्याची वाट पाहत उभे असल्याचे दिसते. त्याचवेळी...

किशोरी घायवट-उबाळे

नेपाळमध्ये माऊंट एव्हरेस्टजवळ दोन हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन भीषण अपघात झाला. मंगळवारी (दि. ३) सकाळी लँडिंगचा प्रयत्न करताना ही घटना घडली. या अपघातात एका भारतीय पर्यटकाचा मृत्यू झाला, तर भारतीय वंशाच्या न्यूझीलंडमधील रहिवाशासह दोन्ही हेलिकॉप्टरचे वैमानिक असे तिघे जखमी झाले. या दुर्घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

अपघात कसा घडला?

नेपाळमधील सोलुखुंबू जिल्ह्यातील खुंबू पासांग ल्हामू ग्रामीण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील फेरिचे येथे हा अपघात झाला. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ८ वाजून ११ मिनिटांनी दोन हेलिकॉप्टर एकाच वेळी उतरण्याचा प्रयत्न करत होती. याचदरम्यान त्यांची एकमेकांशी धडक झाली.

या अपघाताचा ५९ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओमध्ये काही पर्यटक हेलिकॉप्टर उतरण्याची वाट पाहत उभे असल्याचे दिसते. त्याचवेळी अचानक दोन हेलिकॉप्टरची धडक होते. हा प्रकार घडताच घटनास्थळी उपस्थित पर्यटकांमध्ये घबराट पसरते आणि त्यांची धावपळ सुरू होते. काही क्षणांतच परिसरातील वातावरण बदलल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

एव्हरेस्ट परिसरात पर्यटक आणि गिर्यारोहकांच्या वाहतुकीसाठी हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अशा व्यस्त हवाई क्षेत्रात घडलेल्या या अपघातामुळे हवाई वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

अपघातात भारतीय पर्यटकाचा मृत्यू

नेपाळ पोलिसांनी निवेदनाद्वारे या अपघातातील जीवितहानीची माहिती दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, ४७ वर्षीय वसंत कुमार बाळारामारामाडू यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. ते भारतीय नागरिक असून फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. अपघातानंतर त्यांचा मृतदेह लुकला येथील रुग्णालयात नेण्यात आला.

भारतीय वंशाच्या न्यूझीलंड रहिवाशासह तिघे जखमी

या दुर्घटनेत भारतीय वंशाचे ४९ वर्षीय शैलेश कृष्णा पटेल हेही जखमी झाले आहेत. ते न्यूझीलंडचे रहिवासी असून बाळारामारामाडू यांच्यासोबत फिशटेल एअरच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. अपघातानंतर त्यांना प्रभू हेलिकॉप्टरच्या मदतीने एअरलिफ्ट करण्यात आले. पुढील उपचारांसाठी काठमांडू येथील मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याशिवाय, फिशटेल एअरचे वैमानिक रवींद्र प्रजापती आणि एअर डायनेस्टीचे वैमानिक प्रज्वल केसी हे दोन नेपाळी वैमानिकही जखमी झाले आहेत. दोघांनाही पुढील उपचारांसाठी काठमांडू येथे हलवण्यात आले. पोलीस निरीक्षक मौसम तमांग यांनी जखमींची माहिती दिली.

दरम्यान, दोन्ही हेलिकॉप्टरची धडक नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघाताच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये किती प्रवासी होते, यासह दुर्घटनेमागील कारणांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर

Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे

दिवाळीत पाणी कपात स्थगित; ठाणेकरांना किंचित दिलासा; स्टेमपाठोपाठ MIDC चा निर्णय