पाकिस्तानी खवय्यांच्या वडापाव, आलू टिक्कीवर उड्या Canva
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानी खवय्यांच्या वडापाव, आलू टिक्कीवर उड्या

कराची शहरात भारतीय पदार्थ वडापाव, आलू टिक्की, मसाला डोसा व ढोकळा खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

Swapnil S

कराची : पाकिस्तान हा मुस्लिम देश असल्याने तेथील नागरिक मांसाहारास पसंती देत असल्याचा समज आहे. पण, पाकिस्तानातही आता भारतीय शाकाहारी पदार्थांवर खवय्यांच्या उड्या पडत आहेत. कराची शहरात भारतीय पदार्थ वडापाव, आलू टिक्की, मसाला डोसा व ढोकळा खवय्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

कराची हे शहर पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. तसेच ते मुंबईप्रमाणेच कॉस्मोपॉलिटिन शहर आहे. या शहरात ‘सोयाबीन आलू बिर्याणी’, ‘आलू टिक्की’, ‘मसाला डोसा’, ‘ढोकळा’ हे भारतीय पदार्थ लोकांना आवडू लागले आहेत.

कराची ही सिंध प्रांताची राजधानी आहे. या शहरात खाद्यपदार्थांचे विविध पर्याय आहेत. अत्यंत महागड्या युरोपियन व इटालियन पदार्थांपासून किफायतशीर दरातील चायनीजही येथे मिळतात, तर ‘बन कबाब’ नावाचा पदार्थ चवीला व सर्वांच्या खिशाला परवडणारा आहे. आता खवय्यांनी गेल्या काही महिन्यांपासून शुद्ध शाकाहारी पदार्थांवर ताव मारायला सुरुवात केली आहे.

कराचीतील एम. ए. जिन्ना रोडवर महेश कुमार यांचे महाराज करमचंद शाकाहारी रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी पदार्थ चाखण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी उसळत आहे. कारण येथे शुद्ध शाकाहारी भारतीय पदार्थ मिळतात. आमची ‘सोयाबीन आलू बिर्याणी’, ‘आलू टिक्की’, ‘पनीर कढाई’, ‘मिक्स भाजी’ खायला दुपारी जेवणाच्या वेळेस मोठी गर्दी जमते. तसेच हे पदार्थ पार्सल देखील मोठ्या प्रमाणात मागवले जातात, असे कुमार म्हणाले.

कुमार यांनी सांगितले की, १९६० च्या सुमारास माझ्या वडिलांनी हे रेस्टॉरंट सुरू केले. मुस्लिम व अन्यधर्मीय ग्राहकांना आमच्या जेवणाच्या चवीने आकर्षित केले. कारण आम्ही घरगुती मसाले व ताज्या भाज्या वापरून पदार्थ बनवत होतो. आताही आम्ही रेस्टॉरंटची प्रसिद्धी करत नाही. कारण काही मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मनात हिंदूंनी बनवलेले पदार्थ मुस्लिमांनी खाण्याबाबत अढी आहे. पण, आमचे भोजन व सेवा आवडणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. तेच आमची प्रसिद्धी करतात, असे ते म्हणाले.

मुस्लिम, ख्रिश्चन महिलांचेही भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल

हिंदूंच्या रेस्टॉरंटबरोबरच कराचीत ख्रिश्चन व मुस्लिम महिलाही भारतीय पदार्थांचे स्टॉल लावत आहेत. ‘पाव भाजी’, ‘वडा पाव’, ‘मसाला डोसा’, ‘ढोकळा’ आदी पदार्थ ते विकतात.

कराचीतील कँट रस्त्यावर स्टॉल लावणाऱ्या कविताने सांगितले की, माझ्या भारतीय पदार्थांना चांगली मागणी आहे. हे पदार्थ खायला ग्राहकांची गर्दी असते. विशेष म्हणजे मांसाहार करणाऱ्या ग्राहकांना आता भारतीय पदार्थांची चटक लागली आहे, तर ख्रिश्चन महिला मेरी रिचर्डकडील ‘ढोकळा’, ‘आम पन्हे’ व ‘दाल समोसा’ येथे लोकप्रिय आहे. अनेक लोक गाड्यांमधून येऊन रांगा लावून आमचे पदार्थ घेऊन जातात, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी