कीव्ह : यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सोमवारी चर्चा केली. झेलेन्स्की यांनी सोशल मीडियावरून या चर्चेची माहिती दिली.
दोन्ही नेत्यांमध्ये दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध व सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजनैतिक परिस्थितीवर विस्तृत चर्चा झाली.
झेलेन्स्की यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांना रशियाने केलेल्या हल्ल्यांबाबत विस्तृत माहिती दिली. युद्ध संपवण्यासाठी राजनैतिक परिस्थिती अनुकूल असताना रशियाकडून युक्रेनच्या छोट्या शहरांना लक्ष केले जात आहे. रशिया युद्धविरामाऐवजी भूभागावरील कब्जा व हत्या सुरूच ठेवण्याचे संकेत देत आहे, असे त्यांनी सांगितले.
तर पंतप्रधान मोदी यांनी या चर्चेबाबत ‘एक्स’वरून पोस्ट लिहिली. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधल्यानंतर सध्याच्या सर्व घडामोडींविषयी त्यांचे विचार ऐकून मला आनंद झाला. मी युद्धाबाबत तत्काळ व शांततामय तोडगा काढण्याच्या भारताच्या भूमिकेची माहिती त्यांना दिली. भारत प्रत्येक बाबतीत मदत करण्याबरोबरच युक्रेनसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करायला तयार आहे.