नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसांच्या फ्रान्स व अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मोदी हे सोमवारी फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करतील.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच बैठक असेल. ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी अनेक देशांविरुद्ध आक्रमक व्यापारयुद्ध सुरू केल्याने ते भारतासंबंधी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मोदींचा अमेरिका दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी जून २०१७ मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता तर, फेब्रुवारी २०२० मध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे भारत भेटीला आले होते.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स येथे जात आहेत. फ्रान्समध्ये १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या ‘एआय ॲॅक्शन समिट’मध्ये ते सहभागी होतील. यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मार्सिएले येथे पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन केले जाणार आहे.
केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करा! ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला
स्टेडियममध्ये क्रिकेट सामन्यावेळी गोंधळ असतानाही क्रिकेटपटू ज्याप्रमाणे केवळ चेंडूवर लक्ष केंद्रित करतात, त्याप्रमाणे तुम्ही अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास सर्व तणावापासून मुक्त व्हाल, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच दुसऱ्याशी स्पर्धा करण्याऐवजी स्वत:शी स्पर्धा करावी. स्वत:शी स्पर्धा करणाऱ्याचा आत्मविश्वास कायम असतो. तसेच पालकांनी आपल्या मुलांची क्षमता ओळखावी. परीक्षा गरजेची आहे की जीवन याचा विचार करावा, असा सल्ला मोदींनी दिला.
विद्यार्थ्यांची क्षमता ओळखण्याची तयारी शिक्षकांनी दाखवली पाहिजे. तसेच प्रत्येक बाबतीत सकारात्मता ओळखणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांनी पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे. तसेच अभ्यासाबरोबरच चांगली झोप आवश्यक आहे. आपले आई-वडील जे चांगले पदार्थ देतात ते खाल्ले पाहिजे. तसेच लिखाण करण्याची सवय आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
पालकांना सल्ला देताना मोदी म्हणाले की, प्रत्येक आई-वडिलांची मुलांकडून काही अपेक्षा असतात. दुसऱ्या मुलांना पाहून त्यांचा अहंकार दुखावतो. प्रत्येक मूल हे एकसारखे नसते. काहीजण खेळात चांगले तर अभ्यासात मागे असतात. आई-वडील व शिक्षकांनी मुलांमधील प्रतिभा बाहेर काढणे गरजेचे आहे. मुलांच्या कौशल्यावर भर दिला पाहिजे, असे मोदी म्हणाले.