मॉस्को : रशियाच्या सायबेरिया भागातील इर्कुत्स्क येथे एका २८ वर्षीय लॅब कर्मचारी महिलेच्या मृत्यूनंतर न्यूमोनिक प्लेगच्या संभाव्य संसर्गाची चर्चा सुरू झाली आहे. प्रयोगशाळेत २५ सप्टेंबर रोजी जिवंत विषाणू असलेली टेस्ट ट्यूब फुटल्याने तिला हा संसर्ग झाल्याचे सांगितले जात आहे. विषाणूच्या संपर्कात येताच तब्येत खालावल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या संपर्कात आलेल्या जवळपास २०० जणांना खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
संबंधित महिला इर्कुत्स्क अँटी-प्लेग रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत होती. महिलेने रुग्णालयात सांगितले होते की, प्रयोगशाळेत काम करत असताना जिवंत जैविक नमुने असलेली एक टेस्ट ट्यूब तिच्याकडून फुटली होती. मात्र, रशियाची आरोग्य संस्था रोस्पोट्रेबनादझोरने प्रयोगशाळेत कोणतीही टेस्ट ट्यूब फुटल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या नमुन्यात तिच्या प्रयोगशाळेतील कामाशी संबंधित सूक्ष्मजीव आढळलेले नाहीत. त्यामुळे टेस्ट ट्यूबमध्ये नेमका कोणता जैविक नमुना होता, याबाबत सध्या अधिकृत माहिती उपलब्ध नाही.