ट्रम्प यांची इराणला थेट लष्करी कारवाईची धमकी; बैरुतमध्ये हालचालींना वेग; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा रद्द 
आंतरराष्ट्रीय

ट्रम्प यांची इराणला थेट लष्करी कारवाईची धमकी; बैरुतमध्ये हालचालींना वेग; अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दौरा रद्द

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या लष्करी इशाऱ्यानंतर अमेरिकेने लेबनॉनमधील आपल्या दूतावासातून कर्मचाऱ्यांना तातडीने माघारी बोलावले आहे. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचा नियोजित इस्रायल दौराही अचानक रद्द करण्यात आला असून, यामुळे युद्धाची चिन्हे अधिक गडद झाली आहेत.

Swapnil S

न्यूयॉर्क : अमेरिका आणि इराणमधील संघर्ष निर्णायक वळणावर पोहोचला असल्याने मध्य-पूर्वेतील परिस्थिती आता स्फोटक बनली आहे. अमेरिकेने गेल्या २४ तासांत घेतलेल्या दोन मोठ्या निर्णयांनी जगभरात खळबळ माजली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या लष्करी इशाऱ्यानंतर अमेरिकेने लेबनॉनमधील आपल्या दूतावासातून कर्मचाऱ्यांना तातडीने माघारी बोलावले आहे. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचा नियोजित इस्रायल दौराही अचानक रद्द करण्यात आला असून, यामुळे युद्धाची चिन्हे अधिक गडद झाली आहेत.

लेबनॉनची राजधानी बैरूत येथील अमेरिकन दूतावासातील ‘बिगर- गरजेच्या’ कर्मचाऱ्यांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे. सोमवारी जवळपास ३२ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बैरूत विमानतळावरून मायदेशी प्रस्थान केले आहे. एकूण ५० कर्मचाऱ्यांना तातडीने लेबनॉन सोडण्यास सांगण्यात आले असून, सध्या केवळ अत्यावश्यक कर्मचारीच तिथे तैनात राहतील.

मार्को रूबिओंचा दौरा रद्द, चर्चेला उधाण

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबिओ हे इस्रायलच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, ऐनवेळी हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. रूबिओ यांचा दौरा रद्द होण्यामागे अधिकृत कारण दिले नसले तरी, इराणसोबत वाढलेला तणाव आणि कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकणारी लष्करी कारवाई हेच मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे.

ट्रम्प यांचा १० दिवसांचा अल्टिमेटम

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाने इराणच्या गोटात घबराट पसरली आहे. ‘येत्या १० दिवसांत इराणशी करार होणार की अमेरिका थेट लष्करी कारवाई करणार, हे जगाला समजेल,’ अशा शब्दात ट्रम्प यांनी गर्भित इशारा दिला आहे. इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या दिशेने वेगाने पावले उचलत असल्याचा अमेरिका आणि युरोपीय देशांचा आरोप आहे. जर इराणने आपला अट्टाहास सोडला नाही, तर अमेरिका मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत आहे.

प्रतिहल्ला करण्याचा इराणचा इशारा

ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणनेही जशास तसे उत्तर दिले आहे. जर अमेरिकेने हल्ला केला, तर आम्ही शांत बसणार नाही. मध्य-पूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ आणि त्यांचे हितसंबंध हेच आमचे मुख्य लक्ष्य असेल, अशी धमकीही इराणने दिली आहे.

हिजबुल्लाह आणि जुन्या जखमा

अमेरिकेला लेबनॉनमधील 'हिजबुल्लाह' या संघटनेचा मोठा धोका वाटत आहे. १९८३ मध्ये बैरूतमध्ये अमेरिकन मरीन बॅरेक्स आणि दूतावासावर झालेल्या भीषण हल्ल्यात शेकडो अमेरिकन नागरिक मारले गेले होते. या हल्ल्यामागे ‘हिजबुल्लाह’चा हात होता आणि या संघटनेला इराणचे थेट समर्थन आहे. त्यामुळेच, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी अमेरिका आपल्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करत आहे. एकूणच परिस्थिती पाहता, येत्या १० दिवसांत मध्य-पूर्वेचे चित्र बदलण्याची शक्यता असून संपूर्ण जगाचे लक्ष आता अमेरिका आणि इराणच्या पुढील पावलांकडे लागले आहे.

VSR वर कारवाई; अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ॲक्शन मोडमध्ये; चार विमानांच्या उड्डाणावर बंदी

अपघातग्रस्त विमानाचा ३००० तासांचा रेकॉर्डच उपलब्ध नाही! रोहित पवारांच्या X वरील दाव्याने खळबळ; चौकशी लांबवली जात असल्याची शंका

मनपा समित्यांत शोभेच्या बाहुल्या नको!

आजचे राशिभविष्य, २५ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

खांदेदुखीचा त्रास वाढतोय? ऑफिसमध्ये काम करताना फॉलो करा सोप्या टिप्स