डोनाल्ड ट्रम्प | संग्रहित छायाचित्र 
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तान, चीन अणुचाचणी करताहेत; ट्रम्प यांच्या दाव्याने जगभरात खळबळ

रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तानसह अनेक देश अणुचाचण्या करीत असल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तानसह अनेक देश अणुचाचण्या करीत असल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संरक्षण विभागालाही ट्रम्प यांनी अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश देत आपल्या आदेशाचे समर्थन केले आहे.

दरम्यान, ट्रम्प यांनी नुकताच काही देश अण्वस्त्र चाचणी करत असल्याचा दावा केला. यात त्यांनी चीन आणि रशिया हे देश जमिनीखाली गुप्त पद्धतीने अण्वस्त्र चाचणी घेत असल्याचे सांगितले. यावर आता थेट चीनची प्रतिकिया समोर आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांचा हा दावा खोडून काढला आहे. इतकेच नाही तर, हा दावा फेटाळून लावताना, आम्ही एक जबाबदार अणु संपन्न देश आहोत, असे चीनने म्हटले आहे.

ट्रम्प काय म्हणाले

पाकिस्तान आणि चीन अण्वस्त्रांची चाचणी करत आहेत, तसेच रशिया आणि उत्तर कोरिया देखील अण्वस्त्रांची चाचणी करत असल्याचे ते म्हणाले. रशिया आणि चीन चाचण्या करत आहेत, पण ते त्याबद्दल बोलत नाहीत, आपण एक मुक्त समाज आहोत, आपण वेगळे आहोत, आपण त्याबद्दल बोलतो. मला तर त्याबद्दल बोलावेच लागेल, नाहीतर तुम्ही लोक ते रिपोर्ट कराल. त्यांच्याकडे असे रिपोर्टर नाहीत जे त्याबद्दल बोलतील किंवा लिहितील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीन आणि पाकिस्तान आधीच गुप्त चाचण्या घडवत आहेत. रशियाही चाचण्या करत आहे. ते भूमिगत पद्धतीने चाचण्या करतात जिथे लोकांना चाचण्याबाबत नेमके काय चालले आहे याबाबत माहिती नसते, पण त्याची तुम्हाला थोडी कंपने जाणवतात, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

जास्त अण्वस्त्रे

अमेरिकेकडे इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत. माझ्या पहिल्या कार्यकाळात शस्त्रांचे संपूर्ण नूतनीकरणामुळे हे साध्य झाले. प्रचंड विध्वंसक शक्तीमुळे मला ते करण्याचा तिरस्कार वाटला. पण पर्याय नव्हता! रशिया दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु ५ वर्षांच्या आतच ते समान स्थितीवर येतील. इतर देशांच्या चाचणी कार्यक्रमांमुळे मी युद्ध विभागाला समान आधारावर आमच्या अण्वस्त्रांची चाचणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. ती प्रक्रिया त्वरित सुरू होईल, असे ट्रम्प यांनी ट्रुथवरील पोस्टमध्ये म्हटलं होते.

भारत-पाकिस्तान युद्धबंदीचाही नव्याने दावा

भारत- पाकिस्‍तानमध्‍ये अणुयुद्ध होणार होते; अतिरिक्‍त व्‍यापार कराचा इशारा देत दोन्‍ही देशांमधील तणाव कमी केला. दोन्‍ही देशांचे अमेरिकेबरोबर मोठा आर्थिक व्‍यवहार आहे. त्‍यामळे त्‍यांनी युद्ध थांबवले, असा पुन्‍नरुच्‍चारही ट्रम्‍प यांनी केला.

सिस्टिम चाचण्या

ट्रम्प यांच्या या आदेशाने जगात मोठी खळबळ उडाली. अमेरिका अण्वस्त्रांची चाचणी करणार का, याबाबत जगभरातून सवाल उपस्थित करण्यात आले. दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी या संदर्भातील खुलासा केला आहे. अमेरिकेची अण्वस्त्र चाचणी करण्याची कोणतीही योजना नसल्याचं ख्रिस राईट यांनी सांगितले आहे. ट्रम्प यांनी दिलेले आदेश हे अण्वस्त्रांच्या चाचणीच्या संदर्भातील नाहीत. तसेच ज्या चाचण्याचे आदेश दिले आहेत त्या चाचणीत अण्वस्त्र स्फोटांचा समावेश नसून त्या ऐवजी इतर भागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या संदर्भातील आहेत. मला वाटते की आपण सध्या ज्या चाचण्यांबद्दल बोलत आहोत त्या सिस्टम चाचण्या आहेत. हे अण्वस्त्र स्फोट नाहीत. हे असे आहेत ज्यांना आपण नॉनक्रिटिकल स्फोट म्हणतो, असे राईट यांनी सांगितले आहे.

१५० वेळा जग नष्ट करू शकतो

आमच्याकडे १५० वेळा जग उडवून देण्यासाठी पुरेशी अणुशस्त्रे आहेत, असाही दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, ट्रम्प यांच्या या आदेशानंतर अखेर अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी स्पष्टीकरण देत अमेरिकेची अण्वस्त्र चाचणी करण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर