

डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी ताक मोठ्या प्रमाणात प्यायलं जातं. मात्र, डायबिटीज रुग्णांसाठी ताक पिणं सुरक्षित आहे का, असा प्रश्न अनेकांना पडतो.
डायबिटीज रुग्णांसाठी ताक योग्य आहे का?
तज्ज्ञांच्या मते, ताक हे फर्मेंटेड दुग्धजन्य पेय असून त्यामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात. तसेच प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. साधं, गोड न केलेलं ताक मर्यादित प्रमाणात घेतल्यास डायबिटीज रुग्णांसाठी ते सुरक्षित मानलं जातं.
रक्तातील साखरेवर काय परिणाम?
ताकाचा ग्लायसेमिक इंडेक्स साधारण ३५ ते ४० दरम्यान असतो. त्यामुळे ते रक्तातील साखर हळूहळू वाढवतं. एक ग्लास ताकामध्ये सुमारे १० ते १२ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढण्याचा धोका कमी असतो.
ताकाचे फायदे
पचनक्रिया सुधारते.
शरीराला थंडावा मिळतो.
कमी कॅलरीमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत.
शरीर हायड्रेट राहण्यास मदत.
गोड पेयांपेक्षा आरोग्यदायी पर्याय.
ताक पिताना काय काळजी घ्यावी?
नेहमी गोड न केलेलं ताक निवडा.
गोड लस्सी किंवा साखर टाळा.
प्रमाणातच सेवन करा.
पॅकेज्ड ताक टाळून घरचं ताक प्या.
चव वाढवण्यासाठी जिरे, मिरी, आलं किंवा पुदिना वापरा.
कधी प्यावं?
ताक दुपारी जेवणानंतर किंवा ३ ते ४ वाजेदरम्यान प्यायल्यास अधिक फायदेशीर ठरतं. त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि हायड्रेशनही चांगलं राहतं.
डायबिटीज रुग्णांनी योग्य प्रमाणात आणि साधं ताक आहारात घेतल्यास ते सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतं. मात्र, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे स्वतःच्या साखरेची पातळी तपासत राहणं गरजेचं आहे.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)