

अक्षय्य तृतीयानिमित्त घराघरांत गोडधोड पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचा हंगाम सुरू असल्याने 'आमरस' हा पदार्थ खास आकर्षण ठरतो. गोड, सुगंधी आणि चविष्ट आमरस पुरीसोबत खाण्याची मजा काही औरच असते. घरच्या घरी सहज तयार होणारी ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा.
साहित्य :
मध्यम पिकलेले आंबे - ४
वेलदोडे - २० ते २५
साखर - १/२ टेबलस्पून
जायफळ पूड - चिमूटभर
पिठीसाखर - १ टेबलस्पून
कृती :
सर्वप्रथम वेलदोडे आणि साखर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे मिश्रण चाळणीतून गाळून हवाबंद डब्यात साठवून ठेवा. आंबे सर्व बाजूंनी हलके दाबून त्यातील गर एका भांड्यात काढा. आंब्याचा बाठा आणि साल वेगळी करून चांगले मॅश करा. त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली अर्धा टीस्पून वेलदोडा पूड, साखर, जायफळ पूड, आणि पिठीसाखर घाला. सर्व मिश्रण चांगले एकजीव करा. तयार आमरस वाट्यांमध्ये काढून गरम पुरीसोबत सर्व्ह करा.
टिप्स :
आमरस अधिक गोड हवा असल्यास साखरेचे प्रमाण वाढवू शकता.
अधिक मऊ टेक्स्चर साठी मिक्सरमध्ये हलकं फिरवू शकता.
थंडगार आमरस खायचा असेल तर फ्रिजमध्ये ३० मिनिटे ठेवा.
केशर घातल्यास चव आणि रंग दोन्ही वाढतात.
हापूस/अल्फोन्सो आंबा वापरल्यास आमरस टेस्टी होतो.
अक्षय्य तृतीयेच्या सणाला घरच्या घरी तयार केलेला आमरस हा जेवणाची शोभा वाढवतो. सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा.