वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'अमेरिका फर्स्ट' धोरणाची अंमलबजावणी आक्रमकपणे सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रम्प प्रशासनाने जगभरातील जवळपास ३० देशांमध्ये तैनात केलेल्या आपल्या राजदूतांना आणि वरिष्ठ मुत्सद्द्यांना तडकाफडकी माघारी बोलावले आहे. दरम्यान, ट्रम्प आता या महत्त्वाच्या पदांवर आपल्या विश्वासातील व्यक्तींची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.
ट्रम्प प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या राजदूतांची नियुक्ती बायडेन प्रशासनाच्या काळात झाली होती, त्यांची सेवा जानेवारीमध्ये समाप्त होणार असल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने 'करिअर डिप्लोमॅट्स'चा (अनुभवी मुत्सद्दी) समावेश आहे. विशेष म्हणजे हे राजदूत ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाही पदावर होते, मात्र आता त्यांना वॉशिंग्टनमध्ये परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयाचा सर्वाधिक फटका आफ्रिकन देशांना बसला आहे. यामध्ये नायजेरिया, सोमालिया, युगांडा, सेनेगल यांसह एकूण १३ आफ्रिकन देशांचा समावेश आहे. आशिया खंडातून फिलिपाईन्स, व्हिएतनाम, पापुआ न्यू गिनी आणि दक्षिण आशियातील नेपाळ व श्रीलंका येथील राजदूतांनाही बदलण्यात येणार आहे. युरोपमधील स्लोव्हाकिया आणि मॉन्टेनेग्रो यांसारख्या देशांतील राजदूतही या यादीत आहेत.
नव्या जबाबदाऱ्या
जरी या राजदूतांना परत बोलावण्यात आले असले, तरी त्यांच्या परराष्ट्र सेवेतील नोकऱ्यांवर गदा येणार नाही. त्यांना वॉशिंग्टनमध्ये नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. दरम्यान, ट्रम्प आता या महत्त्वाच्या पदांवर आपल्या विश्वासातील व्यक्तींची नियुक्ती करण्याची शक्यता आहे.