आता युद्ध संपले : ट्रम्प; अंतिम निर्णय झाला नसल्याचा इराणचा दावा, दोन दिवसांत शांतता करारावर स्वाक्षरीची शक्यता (संग्रहित छायाचित्र)
आंतरराष्ट्रीय

आता युद्ध संपले : ट्रम्प; अंतिम निर्णय झाला नसल्याचा इराणचा दावा, दोन दिवसांत शांतता करारावर स्वाक्षरीची शक्यता

इराणवर अधिक आक्रमक हल्ले करून तेल उद्योगावर ताबा मिळविण्याची धमकी दिल्यानंतर अवघ्या काही तासातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घूमजाव करीत इराणसोबतचे युद्ध संपले असल्याची मोठी घोषणा शुक्रवारी केली.

Swapnil S

वाशिंग्टन : इराणवर अधिक आक्रमक हल्ले करून तेल उद्योगावर ताबा मिळविण्याची धमकी दिल्यानंतर अवघ्या काही तासातच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घूमजाव करीत इराणसोबतचे युद्ध संपले असल्याची मोठी घोषणा शुक्रवारी केली. दोन्ही देशांमधील शांतता करार अंतिम टप्प्यात आला असून, या सप्ताहाअखेर (शनिवार-रविवार) युरोपमध्ये या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान, इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघई यांनी सांगितले की, शांतता करारावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.

ओव्हल ऑफिसमध्ये गुरुवारी ट्रम्प म्हणाले होते की, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स या ऐतिहासिक करार स्वाक्षरी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी युरोपला जाण्याची शक्यता आहे. या वाटाघाटींबाबत आपण कतार, युएई, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि पाकिस्तानसह मध्यपूर्वेतील अनेक देशांच्या नेत्यांशी चर्चा केल्याचेही त्यांनी नमूद केले.

इराण कधीही अण्वस्त्र तयार करणार नाही

जॉर्जियाचे लेफ्टनंट गव्हर्नर बर्ट जोन्स यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित एका टेलि-रॅलीला संबोधित करताना ट्रम्प यांनी 'आम्ही इराणसोबतचे युद्ध संपवले आहे' अशी जाहीर घोषणा केली. ‘तुम्ही ऐकले की नाही मला माहित नाही, पण आम्ही इराणसोबतचे युद्ध संपवले आहे. इराणने कधीही अण्वस्त्रे तयार न करण्याचे मान्य केले आहे,ज्यासाठी आम्ही आग्रही होतो. आमचा मुख्य उद्देश हाच होता,’ असे ट्रम्प यांनी रॅलीत सांगितले.

सविस्तर सामंजस्य करार

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, हा एक अत्यंत मजबूत आणि सविस्तर सामंजस्य करार आहे. या करारामुळे जागतिक बाजारपेठेला आणि शेअर बाजाराला मोठा दिलासा मिळाला असून, करार पूर्ण होताच 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' पुन्हा वाहतुकीसाठी खुला केला जाईल. इराणने अण्वस्त्र निर्मितीचे सर्व प्रयत्न कायमचे सोडण्याचे मान्य केले आहे. ते कोणत्याही प्रकारे अण्वस्त्रे खरेदी किंवा विकसित करणार नाहीत, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला. इराण या करारासाठी कसा तयार झाला, या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, इराणने गेल्या काही काळात प्रचंड आर्थिक आणि लष्करी फटका सहन केला आहे. त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांनाच हा करार करण्याची जास्त गरज होती.

पुनर्बांधणीसाठी ३०० अब्ज डॉलरचा निधी

पश्चिम आशियातील दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य शांतता कराराचा १४ मुद्द्यांचा मसुदा समोर आला असून, या मसुद्यामुळे जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मसुद्यात इराणवरील आर्थिक निर्बंध हटविणे, गोठवून ठेवलेला निधी मुक्त करणे, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा पूर्ण क्षमतेने खुली करणे आणि इराणच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल ३०० अब्ज डॉलरचा निधी उपलब्ध करून देणे अशा महत्त्वपूर्ण तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे.

पावसाचे संकट गहिरे; प्रशांत महासागरात १९५० नंतरचा सर्वाधिक शक्तिशाली ‘एल निनो’ सक्रिय, मान्सूनवर विपरीत परिणामाची शक्यता

IND vs AFG 1st ODI : अफगाणिस्तानविरुद्ध धरमशाला येथे पहिला सामना; रोहितसह भारताच्या कामगिरीकडे आज लक्ष

विद्यापीठांपेक्षा कारागृहे झाली उदंड

आजचे राशिभविष्य, १३ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

बदाम तेलाचे फायदे वाचाच; आजपासूनच वापर सुरू कराल!