काठमांडू विमानतळावर लँडिंगवेळी तुर्किश एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग; २७८ प्रवासी थोडक्यात वाचले, Video (Photo-X/@ani_digital)
आंतरराष्ट्रीय

काठमांडू विमानतळावर लँडिंगवेळी तुर्किश एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग; २७८ प्रवासी थोडक्यात वाचले, Video

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये विमानाच्या लँडिंग गिअरमधून आग आणि धूर निघताना तसेच धावपट्टीवर आपत्कालीन पथकांनी विमानाला वेढा घातल्याचेही दिसून आले.

किशोरी घायवट-उबाळे

नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (दि.११) सकाळी मोठी दुर्घटना टळली. लँडिंगदरम्यान तुर्किश एअरलाइन्सच्या विमानाच्या टायरला आग लागल्याने नेपाळमधील आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर काही काळ परिणाम झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये विमानाच्या लँडिंग गिअरमधून आग आणि धूर निघताना तसेच धावपट्टीवर आपत्कालीन पथकांनी विमानाला वेढा घातल्याचेही दिसून आले.

घटनेची माहिती

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तुर्किश एअरलाइन्सच्या टीके-७२६ या विमानासोबत घडली. हे विमान इस्तंबूलहून काठमांडूकडे आले होते. सकाळी सुमारे ६:४५ वाजता विमान धावपट्टीवर उतरतानाच त्याच्या चाकांना आग लागल्याचे सांगण्यात आले.

तातडीने अग्निशमन दल दाखल

घटनेनंतर तातडीने आपत्कालीन प्रतिसाद पथके घटनास्थळी दाखल झाली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी नंतर आग पूर्णपणे विझवण्यात आल्याची आणि विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली.

नेपाळच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भूल यांनी सांगितले की, "प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घटनेनंतर तात्काळ आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे उघडण्यात आले."

विमानात २७८ प्रवासी

या विमानात चार मुलांसह एकूण २७८ प्रवासी आणि कर्मचारी होते. प्रवाशांना विमानातून बाहेर काढताना काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, या विमानातून मालवाहतूक आणि मानवी मृतदेहही नेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

परिस्थिती नियंत्रणात

विमानतळ सुरक्षा अधिकारी एसपी राजकुमार सिलवाल यांनी एएनआयशी बोलताना परिस्थिती तातडीने नियंत्रणात आणल्याचे सांगितले.

"तुर्किश एअरलाइन्सचे टीके ७२६ हे विमान इस्तंबूलहून काठमांडूकडे येत होते. लँडिंगदरम्यान टायरला आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले," असे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा प्रभावित

या घटनेनंतर संबंधित विमान धावपट्टीवरच अडकून राहिल्याने विमानतळावरील आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवांवर तात्पुरता परिणाम झाला. धावपट्टी साफ करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत काठमांडूच्या हवाई क्षेत्रात येणारी अनेक विमाने थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अनेक विमानांचे उड्डाण विलंबित

या घटनेमुळे दिल्लीहून येणारे एअर इंडिया एआय २१५ आणि शारजाहहून येणारे एअर अरेबिया जी९ ५३६ यांसह अनेक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. याशिवाय, ड्रुकएअर, फ्लायदुबई आणि नेपाळ एअरलाइन्सच्या उड्डाणांनाही धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आल्यामुळे विलंब झाला.

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट