वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारासाठी ७ फेब्रुवारी रोजी एक आराखडा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने ऑनलाईन प्रसिद्ध केलेल्या एका नकाशात संपूर्ण जम्मू-काश्मीरचा प्रदेश (पाकव्याप्त काश्मीरसह) भारताचा भाग म्हणून दाखविण्यात आला होता. इतकेच नव्हे तर अक्साई चीन हाही भारताचा भाग असल्याचे दर्शविण्यात आले होते. मात्र त्यानंतर अमेरिकेने यू-टर्न घेत भारताचा तो नकाशा हटविला आणि पोस्ट डिलिट केली. याबाबत आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'डॅमेज कंट्रोल'ची मोहिम हाती घेतली आहे. आम्ही आक्षेप नोंदवताच अमेरिकेने संबंधित पोस्ट हटवली, असा दावा त्यांनी केला आहे.
नकाशा हटवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव
अमेरिकेने सोशल मीडियावर संपूर्ण जम्मू-काश्मीरचा प्रदेश (पाकव्याप्त काश्मीरसह) भारताचा भाग असल्याचा नकाशा टाकल्यानंतर पाकिस्तानची चांगलीच धावाधाव उडाली होती. भारताचा अधिकृत नकाशा अमेरिकेनेही अधिकृतपणे पोस्ट केल्यामुळे पाकची कोंडी झाली होती. याबाबत माहिती देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर आंद्राबी यांनी सांगितले की, तातडीने पावलं उचलत त्यांनी वॉशिंग्टनशी संपर्क साधून आक्षेप नोंदवला होता.
आता आम्ही समाधानी आहोत
“हा नकाशा काही अधिकृत हँडल्सवर पोस्ट करण्यात आला होता. आम्ही अमेरिकन अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या चूक लक्षात आली.", असे त्यांनी सांगितले. अमेरिकेने "आवश्यक दुरुस्ती" केली असून संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार जम्मू-काश्मीर हा वादग्रस्त प्रदेश असून हा प्रश्न जनमत चाचणीद्वारे सोडवला जावा, या भूमिकेचा उल्लेख असलेला नकाशा अधोरेखित केला आहे. याबाबत आम्ही समाधानी आहोत", असे ते म्हणाले.
अमेरिकेच्या ‘युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’ (USTR) या संस्थेने ७ फेब्रुवारी रोजी भारताचा अधिकृत नकाशा पोस्ट केला होता. भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर हा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला होता. विशेष म्हणजे, यापूर्वी अमेरिकेकडून प्रसिद्ध होणाऱ्या नकाशांमध्ये PoK आणि अक्साई चिन हे वादग्रस्त भाग म्हणून दर्शवले जात असत. मात्र, या वेळी पोस्ट करण्यात आलेल्या नकाशात संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि लडाख भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखवण्यात आले होते.
अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, भारताने सातत्याने सांगितले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश “ काल, आज आणि उद्याही भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग राहील.” तसेच अक्साई चिन हाही भारताच्या भूभागाचा अविभाज्य हिस्सा असल्याची भूमिका नवी दिल्लीने कायम ठेवली आहे. परंतु अधिकृत अमेरिकन हँडलवरून असा नकाशा शेअर करणे हे धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे होते. तथापि, नकाशाची पोस्ट हटवल्याने आता अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अमेरिकेने मात्र या विषयावर कोणतीही अधिकृत टिप्पणी जारी केलेली नाही.