वॉशिंग्टन/तेहरान : इराणची संस्कृती नष्ट करण्याची धमकी देऊन त्यासाठी दिलेली मुदत संपण्याच्या केवळ ९० मिनिटे आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानने प्रस्तावित केलेला दोन आठवड्यांचा युद्धविराम मान्य केल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे पश्चिम आशियातील युद्धाच्या छायेत असलेल्या जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाचा स्वीकार केला असून, शुक्रवारी इस्लामाबादमध्ये अमेरिकेसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांना १० एप्रिलला इस्लामाबादमध्ये सर्व वाद सोडवण्यासाठी अंतिम वाटाघाटी करण्याचे आमंत्रण दिले आहे.
ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर ही नाट्यमय घोषणा केली. इराणला नष्ट करण्याच्या ट्रम्प यांच्या धमकीनंतर अमेरिकेत डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय समोर आला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते, इराणकडून एक १० कलमी प्रस्ताव प्राप्त झाला असून, जो चर्चेसाठी एक व्यवहार्य आधार ठरू शकतो. ते म्हणाले की, या दोन आठवड्यांच्या कालावधीचा उपयोग युद्धाचा कायमस्वरूपी अंत करण्यासाठी केला जाईल. आम्ही आमची बहुतांश लष्करी उद्दिष्टे पूर्ण केली आहेत आणि मध्यपूर्वेत दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्याच्या कराराच्या आम्ही खूप जवळ आहोत. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही याला दुजोरा दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जर इराणवरील हल्ले थांबले, तर आमचे सशस्त्र दल त्यांचे बचावात्मक ऑपरेशन थांबवेल. तसेच पुढील दोन आठवडे इराणच्या लष्कराच्या समन्वयाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून वाहतूक शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
होर्मुझबाबत काय ठरले?
हा युद्धविराम होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या अटीवर आधारित आहे. ही सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अब्बास अराघची यांनी सांगितले की, ते प्रतिहल्ले थांबवतील आणि या मार्गातून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करतील. या करारानुसार, अमेरिका आणि इस्रायल आपले हल्ले थांबवतील. इराणही आपले हल्ले थांबवेल. या कालावधीत इराणच्या लष्कराच्या मदतीने 'होर्मुझच्या सामुद्रधुनी'तून तेल टँकर्स, वायू वाहतूक करणारी जहाजे आणि इतर नौकांची सुरक्षित आवकजावक सुनिश्चित केली जाईल.
हल्ले थांबवण्याचे निर्देश
इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आलेल्या एका निवेदनात, लष्कराच्या सर्व शाखांना सर्वोच्च नेत्यांच्या निर्देशांचे पालन करण्याचे आणि गोळीबार तत्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निवेदनात हेही स्पष्ट करण्यात आले की, यामुळे हा संघर्ष संपुष्टात आलेला नाही, तर ही केवळ एक तात्पुरती उपाययोजना आहे. असे असले तरी, लष्कराच्या सर्व तुकड्यांना या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीयांना आवाहन
दरम्यान, मध्यपूर्वेत इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही भारत सरकारने इराणमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांसाठी नवी अॅडव्हायजरी जारी केली आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासाने भारतीयांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचे आवाहन केले आहे. ॲडव्हायजरीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, भारतीय नागरिकांनी ठरवलेल्या मार्गांचाच वापर करावा आणि दूतावासाशी संपर्क न साधता कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमेच्या दिशेने जाऊ नये. यापूर्वी परिस्थिती गंभीर झाल्यावर भारतीयांना ४८ तास घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, युद्धविरामानंतरही भारताने सावध भूमिका घेत नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, संघर्ष सुरू होताना सुमारे ९,००० भारतीय इराणमध्ये होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा समावेश होता. आतापर्यंत जवळपास १,८०० नागरिक सुरक्षितपणे भारतात परतले असून उर्वरित लोकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इराणचा दहा कलमी प्रस्ताव
अमेरिकेने ‘व्यवहार्य’ म्हणून स्वीकारलेल्या इराणच्या १०-कलमी प्रस्तावामध्ये इराणविरुद्ध पुढील आक्रमक कृत्ये होणार नाहीत याची खात्री करण्याची अमेरिकेची वचनबद्धता, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायम, इराणच्या युरेनियम संवर्धन हक्कांची स्वीकृती, सर्व प्राथमिक निर्बंध हटवणे, सर्व दुय्यम निर्बंध हटवणे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेद्वारे इराणविरुद्धचे सर्व ठराव रद्द करणे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या नियामक मंडळाने घेतलेले ठराव रद्द करणे, युद्धातील नुकसानीबद्दल इराणला नुकसानभरपाई देणे, या प्रदेशातून अमेरिकेच्या लढाऊ सैन्याची माघार, लेबनॉनसह सर्व आघाड्यांवर शत्रुत्वाची समाप्ती यांचा समावेश आहे.
करार लेबनॉनवर लागू नाही
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची कूटनीतिक घडामोड समोर आली आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामावर सहमती झाली आहे. मात्र, इस्रायलने स्पष्ट केले आहे की, हा करार लेबनॉनवर लागू होणार नाही, त्यामुळे संपूर्ण प्रदेशातील संघर्ष थांबण्याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या युद्धविरामाला समर्थन देत असताना स्पष्ट केले आहे की, हा करार लेबनॉनवर लागू होणार नाही. याचा अर्थ लेबनॉनमध्ये, विशेषतः हिजबुल्लाहविरोधातील इस्रायलची लष्करी कारवाई सुरू राहू शकते.
'ड्राफ्ट'वरून शरीफ ट्रोल
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा ऐतिहासिक युद्धविराम जाहीर झाला आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत मध्यस्थी करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ एका मोठ्या डिजिटल चुकीमुळे ट्रोल होत आहेत. युद्धविरामाच्या घोषणेपूर्वी शरीफ यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली होती, ज्याच्या सुरुवातीला चुकून मजकुराचे स्वरूप दर्शवणारा 'ड्राफ्ट'' हा शब्द राहिल्याने त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला आहे.
शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना इराणला दिलेली मुदत वाढवण्याची आणि शांततेसाठी वेळ देण्याची विनंती केली होती. मात्र, हे ट्विट पोस्ट करताना त्याच्या सर्वात वरच्या भागात असे लिहिले होते की, 'ड्राफ्ट - मॅसेज फ्रॉम द प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान ऑन एक्स'. या एका ओळीमुळे सोशल मीडियावर युजर्सनी संशय व्यक्त केला आहे. सामान्यतः पंतप्रधानांची टीम ड्राफ्ट तयार करताना 'पंतप्रधानांचा संदेश' असे लिहिते, मात्र त्यात 'पाकिस्तानचे पंतप्रधान' असा उल्लेख असल्याने हा मजकूर बाहेरून, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून पाठवण्यात आला असावा, असा तर्क लावला जात आहे.
ट्विट 'एडिट'
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने हे ट्विट त्वरित एडिट करून त्यातील 'ड्राफ्ट' हा शब्द हटवला. मात्र, तोपर्यंत नेटकऱ्यांनी याचे स्क्रीनशॉट्स काढून ते व्हायरल केले होते. मात्र अनेक युजर्सनी सवाल केला की, आपल्याच देशाच्या पंतप्रधानांचे नाव ड्राफ्टमध्ये कोण लिहिते, ही स्पष्टपणे अमेरिकेकडून आलेली 'स्क्रिप्ट' वाटत आहे. या चुकीमुळे पाकिस्तानची मध्यस्थी ही केवळ नावापुरती असून पडद्यामागून सूत्रे अमेरिका हलवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ट्विटमधील मजकूर
ट्विटमध्ये शरीफ यांनी म्हटले की, मध्यपूर्वेतील युद्ध शांततेने सोडवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. मी ट्रम्प यांना विनंती करतो की त्यांनी चर्चेसाठी २ आठवड्यांची मुदत वाढवावी. आम्ही आमच्या इराणी बांधवांना विनंती करतो की त्यांनी सदिच्छा म्हणून २ आठवड्यांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावी. दीर्घकालीन शांततेसाठी सर्व युद्धखोर पक्षांनी २ आठवड्यांचा युद्धविराम पाळावा. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही वेळातच दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला. इराणने याला आपला 'विजय' म्हटले आहे, तर पाकिस्तानने या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या 'ड्राफ्ट' प्रकरणामुळे पाकिस्तानच्या सोशल मीडिया टीमच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चीनकडे निघालेला टॅंकर भारताच्या दिशेने वळला
मध्यपूर्वेत शस्त्रसंधी झाल्याने अनेक देशांचा जीव भांड्यात पडला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे अनेक देशांसमोर इंधन संकट निर्माण झाले होते. या सगळ्याच देशांना शस्त्रसंधीमुळे दिलासा मिळाला आहे. भारतात तब्बल सात वर्षांनी इराणमधून खनिज तेल येणार आहे. यावेळी या सगळ्या घडामोडींमध्ये एक नाट्यमय वळण आले आहे. सुरुवातीला चीनच्या दिशेने निघालेला तेलाचा टँकर आता भारताच्या दिशेने वळला आहे. क्युरेको झेंडा असलेला तेलाचा एक मोठा टँकर 'जया' आता भारताच्या पूर्व किनाऱ्याच्या दिशेने येत आहे. हा टँकर आधी आग्नेय आशियाच्या मार्गाने चीनकडे जात होता. पण त्याने अचानक मार्ग बदलला आहे. हा बदल केवळ सामान्य व्यापारी निर्णय नाही, तर तो बदलत्या जागतिक परिस्थितीचा संकेत आहे. शिपिंग डेटामधून ही बाब स्पष्ट झाली आहे.
'जॉर्डन' टँकरही भारताकडे
'जया' टँकरमधील तेलाची खरेदी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने केली आहे. ही देशातील सर्वात मोठी सरकारी तेल कंपनी आहे. कंपनीने याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारताने इराणी तेलाची खरेदी अतिशय वेगात सुरू केल्याचे संकेत मिळू लागले आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताने इराणकडून तेल घेणे बंद केले होते. मात्र, अमेरिकेने निर्बंध उठवल्याने इराणी तेलाची खरेदी सोपी झाली आहे. ‘जॉर्डन’ नावाचा आणखी एक टँकरदेखील भारताकडे येत आहे.
अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांमुळे भारताने सौदी अरेबिया, इराक आणि अमेरिकेकडून खनिज तेलाची खरेदी सुरू केली होती. पण आता परिस्थिती बदलली आहे. मध्यपूर्वेतील संघर्षामुळे होर्मुझच्या सामु्द्रधुनीतून होणारी तेल वाहतूक जवळपास ठप्प झाली. यानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या. त्या नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिकेने इराणी तेलावरील निर्बंध उठवले. याचा फायदा इराणसह भारताला होताना दिसत आहे. भारतामधील तेल शुद्धीकरण कंपन्या बऱ्याच कालावधीपासून स्वस्त आणि स्थिर तेल पुरवठ्याच्या शोधात होत्या. त्यांना इराणच्या रुपात चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे भारतीय तेल कंपन्यांना फायदा होईल.
पुन्हा ‘टॅरिफ’ची घोषणा
युद्धविरामानंतर ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणमध्ये सकारात्मक सत्ता परिवर्तन झाले आहे. आमच्या १५ अटींपैकी अनेक अटी इराणने मान्य केल्या आहेत. यातील काही अटी त्यांनी आधीच मान्य केल्या होत्या. आता इराण युरेनियम संवर्धन करणार नाही. अमेरिका इराणसोबत मिळून काम करेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. सोबतच ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ५० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. जे देश इराणला शस्त्र पुरवतील त्यांच्याकडून ५० टक्के टॅरिफ आकारला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीच अनेक देशांवर टॅरिफ लावला आहे. टॅरिफचा मोठा फटका हा त्या देशांना बसत आहे. टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेमध्ये निर्यात होणाऱ्या वस्तूंवर परिणाम झाला आहे. ज्या देशांवर डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावला आहे, त्या देशांच्या वस्तू अमेरिकेत महाग झाल्या आहेत, त्यामुळे त्यांची अमेरिकेतली मागणी देखील कमी झाली आहे. दरम्यान, याचा फटका हा अमेरिकेला देखील बसत आहे. अमेरिकेत देखील अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवत असून महागाई गगनाला भिडली आहे. त्यातच आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या टॅरिफची घोषणा केली आहे. जे देश इराणला शस्त्र पुरवतील त्यांच्यावर ५० टक्के टॅरिफ लावला जाणार आहे.
पाकिस्तानाचा मध्यस्थीचा प्रस्ताव
आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी नमूद केले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी मला विनंती केली की, आज रात्री इराणवर होणारा विनाशकारी हल्ला थांबवण्यात यावा. त्या बदल्यात इराणने 'होर्मुझची सामुद्रधुनी' पूर्णपणे, तत्काळ आणि सुरक्षितपणे खुली करण्यास मान्यता दिली आहे. ट्रम्प पुढे म्हणाले की, मी दोन आठवड्यांच्या कालावधीसाठी इराणवरील बॉम्बहल्ला आणि आक्रमण स्थगित करण्यास सहमत आहे. हा युद्धविराम दोन्ही बाजूंकडून पाळला जाईल.
होर्मूझमधून जाणाऱ्या जहाजांवर इराण शुल्क आकारणार
होर्मूझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजामागे २० लाख डॉलर्सचे शुल्क आकारले जाईल, जे ओमानसोबत वाटून घेतले जाईल, असे इराणने जाहीर केले आहे.
युद्धविरामानंतरही इस्त्रायलचा इराणवर हल्ला
इराणमधील लावान बेटावर असलेल्या एका तेल शुद्धीकरण केंद्रावर बुधवारी हल्ला झाल्याचे वृत्त इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दिले आहे. विशेष म्हणजे, युद्धविराम जाहीर झाल्याच्या अवघ्या काही तासांनंतर हा हल्ला करण्यात आला. सरकारी वृत्तानुसार, या हल्ल्यामुळे रिफायनरीमध्ये मोठी आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान ती आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हा हल्ला नेमका कोणी केला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
इराणला युरेनियम समृद्ध करण्याची परवानगी दिली जाणार नाही - ट्रम्प
युद्धविरामाचा हा प्रस्ताव एका व्यापक शांतता कराराचा पाया ठरु शकतो. तसेच दोन्ही देशांमधील "जवळपास सर्वच" प्रमुख मुद्द्यांचे तत्त्वतः निराकरण करण्यात आले आहे. मात्र, इराणला युरेनियम समृद्ध करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी अमेरिका इराणसोबत काम करेल. अमेरिका उपग्रहांच्या माध्यमातून इराणच्या अणुसाठ्यावर देखरेख ठेवून आहे आणि कोणतीही हालचाल लपवून ठेवणे शक्य नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
सेन्सेक्स, निफ्टीमध्ये तेजी
युद्धविरामाच्या घोषणेनंतर जागतिक बाजारांमधील जोरदार तेजी आणि कच्च्या तेलाच्या किमतींमधील घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी जवळपास ४ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राखत सेन्सेक्स २,९४६.३२ अंकांनी म्हणजेच ३.९५ टक्क्यांनी वधारत ७७,५६२.९० अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी ८७३.७० अंकांनी म्हणजेच ३.७८ टक्क्यांनी वधारत २३,९९७.३५ अंकांवर बंद झाला.
सोने-चांदी दरात मोठी वाढ
बुधवारी दिल्लीत चांदीच्या दरात ११,००० रुपयांची मोठी वाढ होऊन ती २.५१ लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली; तर ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरातही ३,२०० रुपयांची - २.०९ टक्क्यांची वाढ झाली आणि सोन्याचा भाव १,५६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.
डॉलर्सच्या तुलनेत रुपया भक्कम
देशांतर्गत शेअर बाजारात तेजी आल्याने बुधवारी रुपया डॉलरच्या तुलनेत तीन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला. बुधवारी रुपया प्रति डॉलर ९२.५४ वर स्थिरावला. तो त्याच्या मागील बंद भावापेक्षा (९३.००७५) ५२ पैशांनी अधिक होता. इतर आशियाई चलनांनी डॉलरच्या तुलनेत ०.५-१.७% ची वाढ नोंदवली.
कच्चे तेल घसरले
युद्धविरामाच्या सहमतीनंतर कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या. बुधवारी ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती जवळपास १४%ने घसरल्या. जून डिलिव्हरीसाठीचे ब्रेंट क्रूड फ्युचर्स भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:३० वाजता प्रति बॅरल ९४.९६ डॉलरवर व्यवहार करत होते. तर मंगळवारी बाजार बंद होताना ते प्रति बॅरल १०९.२७ डॉलर होते. दिवसभरात किमतींनी प्रति बॅरल ९१.७० डॉलरचा नीचांक गाठला होता. (सविस्तर वृत्त : अर्थशक्ति)