वॉशिंग्टन : अमेरिका १ ऑगस्ट २०२५ पासून १०० देशांतून होणाऱ्या आयातींवर १० टक्के ‘जशास तसा’ कर लावणार आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेंट यांनी याबाबीला दुजोरा दिला आहे. बेसलाईन टॅरिफ व्यापक रूपाने लागू होणार आहे. सध्या जे देश अमेरिकेसोबत चर्चा करताहेत त्यांच्यावरही व्यापकही ‘जशास तसा’ कर लावला जाणार आहे.
बेसेंट यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चा करणाऱ्यांशी कसा व्यवहार करतात हे आम्ही पाहत आहोत. आम्ही जवळपास १०० देशांना किमान १० टक्के ‘जशास तसा’ कर लावणार आहोत. त्यानंतर आम्ही आणखी पुढे जाऊ, असे त्यांनी सांगितले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, १२ देशांवर ‘आमचा कर स्वीकारा किंवा सोडून द्या’ या तत्त्वावर नवीन टॅरिफ स्तरावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. मात्र, या देशांचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. या कथित यादीत भारत, जपान व युरोपियन संघाचे सदस्य सामील आहेत.
प्रशासनाने सांगितले की, टॅरिफ अमेरिकन निर्यातीसाठी अनुकूल व्यापार अटी पुढे नेण्यासाठी बनवल्या आहेत. मात्र, जगातील अर्ध्याहून अधिक देशांना लक्ष्य करणे हा आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
भारताला तत्काळ आवश्यकतेचा सामना करावा लागत आहे. कारण भारतीय वस्तूंवरील २६ टक्के टॅरिफची समाप्ती ९ जुलै रोजी समाप्त होत आहे. जर भारत व अमेरिकेत कोणताही व्यापार करार झाला नाही, तर १ ऑगस्टपासून भारताच्या निर्यातीवर उच्च आयात कर अमेरिका लावू शकते. या आठवड्यात हालचाली वेगवान झाल्या आहेत. भारतीय अधिकारी दीर्घ चर्चेनंतर वॉशिंग्टनहून मायदेशी परतले आहेत. मात्र, करार होऊ शकलेला नाही. भारतावर कृषी व डेअरी उत्पादनांची बाजारपेठ उघडण्याचा दबाव आहे. तर भारत आपल्या हिश्श्यातील कपडे, चामडे व रत्न आदींसाठी आणखी बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी अमेरिकेकडे करत आहे. अमेरिकेने आतापर्यंत भारतासहित कोणत्याही देशाला पोलादाच्या टॅरिफबाबत सवलत देण्यास नकार दिला.