सोशल मीडियावर सध्या रेल्वेतील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक प्रवासी वातानुकूलित (AC) डब्यातील अप्पर बर्थवर बसून पेटता दिवा आणि अगरबत्ती लावून पूजा करताना दिसत आहे. या प्रकारामुळे रेल्वेतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भारतीय रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत संबंधित प्रवाशाचा शोध सुरू केला आहे.
व्हायरल व्हिडिओत नेमकं काय दिसतं?
सुमारे एक मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये एक प्रवासी AC डब्यात अप्पर बर्थवर बसून निरंजन आणि अगरबत्ती लावून पूजा करताना दिसतो. डब्यातील इतर प्रवासी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करताना आणि "यामुळे सर्वांचा जीव धोक्यात येऊ शकतो," असे सांगतानाही ऐकू येतात. मात्र, त्या प्रवाशाने इतरांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
व्हायरल व्हिडिओ पाहा
रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू
माध्यमांतील वृत्तानुसार, रेल्वे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित व्हिडिओ सर्वप्रथम कोणत्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला, याचा तांत्रिक तपास सुरू आहे. त्यानंतर ट्रेन क्रमांक, प्रवाशाची ओळख आणि संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
रेल्वे प्रवासात 'या' वस्तूंना बंदी
प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय रेल्वेने काही वस्तूंवर बंदी घातली आहे. या वस्तू ट्रेनमध्ये नेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता असते.
बंदी असलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये -
पेटती शेगडी किंवा कोणत्याही प्रकारचे गॅस सिलेंडर
रॉकेल (केरोसीन), पेट्रोल, डिझेल किंवा इतर ज्वलनशील द्रव्ये
फटाके, स्फोटके किंवा ज्वलनशील साहित्य
पेटता दिवा, मेणबत्ती किंवा उघड्या ज्वालेचा वापर
मोठ्या प्रमाणात ज्वलनशील कागद किंवा पोस्टर्स
अशी चूक केल्यास काय होऊ शकते?
रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित प्रवाशावर कारवाई होऊ शकते. परिस्थितीनुसार दंड, कायदेशीर कारवाई किंवा गंभीर प्रकरणांमध्ये गुन्हाही दाखल होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा निष्काळजीपणामुळे ट्रेनमधील शेकडो प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आणि कोणतीही ज्वलनशील वस्तू किंवा उघडी ज्योत ट्रेनमध्ये वापरू नये, असे आवाहन केले आहे.