काय सांगता! दादरचा 'अशोक वडा पाव' जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत; टॉप ४० मध्ये मिळवले स्थान 
लाईफस्टाईल

काय सांगता! दादरचा 'अशोक वडा पाव' जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत; टॉप ४० मध्ये मिळवले स्थान

मुंबईतील दादरचा प्रसिद्ध अशोक वडा पाव जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत झळकला आहे. 'टेस्टॲटलस'च्या टॉप ४० यादीत स्थान मिळवत मुंबईच्या लोकप्रिय स्ट्रीट फूडने जागतिक स्तरावर आपली छाप पाडली आहे.

Mayuri Gawade

मुंबईकरांचा लाडका वडा पाव आता जागतिक स्तरावरही आपली छाप पाडत आहे. दादरमधील प्रसिद्ध अशोक वडा पावला ‘टेस्टॲटलस’ने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित सँडविचच्या यादीत स्थान मिळाले असून या यादीत त्याने २५ वे स्थान पटकावले आहे.

या मानांकनामुळे भारतीय स्ट्रीट फूडची लोकप्रियता पुन्हा एकदा जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे. अनेक दशकांपासून मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेला अशोक वडा पाव हा शहराच्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग मानला जातो.

किर्ती कॉलेज वडा पाव म्हणूनही ओळख

दादर पश्चिम येथील किर्ती कॉलेजजवळ असल्यामुळे हा वडा पाव ‘किर्ती कॉलेज वडा पाव’ या नावानेही प्रसिद्ध आहे. मुंबईत असंख्य ठिकाणी वडा पाव मिळत असला तरी अशोक वडा पावची चव आणि ओळख वेगळी असल्याचे खाद्यप्रेमी मानतात.

‘चुरा पाव’ आहे खास आकर्षण

अशोक वडा पावमधील सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे ‘चुरा पाव’. पारंपरिक वडा पावपेक्षा वेगळ्या या प्रकारात तळलेल्या पिठाचे कुरकुरीत कण म्हणजेच ‘चुरा’ भरपूर प्रमाणात वापरला जातो. त्यासोबत तिखट लसूण चटणी आणि गोड चिंचेची चटणी यांचा संगम या पदार्थाची चव अधिक खास बनवतो.

वडा पावच्या इतिहासाशीही नाते

अशोक वडा पावचा संबंध वडा पावच्या इतिहासाशीही जोडला जातो. १९६६ मध्ये अशोक वैद्य यांनी दादर रेल्वे स्थानकाबाहेर एक छोटा खाद्य स्टॉल सुरू केल्याचे सांगितले जाते. कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वस्त, पोटभर आणि सहज खाता येईल असा पदार्थ देण्याचा त्यांचा उद्देश होता.

ताज्या बटाटेवड्याला पावामध्ये ठेवून त्यासोबत चटण्या देण्याची कल्पना लवकरच लोकप्रिय ठरली. पुढे हाच पदार्थ ‘वडा पाव’ म्हणून संपूर्ण मुंबईची ओळख बनला.

आजही लागतात रांगा

वर्षानुवर्षे उलटून गेल्यानंतरही किर्ती कॉलेजजवळील या स्टॉलसमोर आजही ग्राहकांच्या रांगा लागतात. विद्यार्थी, नोकरदार, पर्यटक तसेच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही या ठिकाणी वडा पावचा आस्वाद घेण्यासाठी भेट देतात.

जागतिक यादीत स्थान मिळाल्यामुळे मुंबईच्या खाद्यसंस्कृतीतील या प्रतिष्ठित वडा पावची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

CJP Protest : 'अपवादात्मक परिस्थितीत पेलेट गन चालवण्याचा पोलिसांना अधिकार'; RAF च्या दारुगोळा वापराच्या नोंदी जतन करा - SC

'तुम्ही पतंजलीवर लक्ष द्या नाहीतर बंद पडेल'; रामदेव बाबांना अभिजीत दिपकेंचे प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याचे बनावट पत्र व्हायरल; PIB चा खुलासा

Mumbai : अटल सेतूवर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवण्याचा स्टंट; व्हिडीओ व्हायरल होताच रायडरविरोधात FIR दाखल

तोरणमाळच्या झिपलाईनवर जीव टांगणीला! ३,५०० फूट दरीवर अडकला पर्यटक; थरार पाहून धडकी भरेल, बघा Video