साध्या जेवणाचीही मज्जा वाढेल; घरच्या घरी करा कुरकुरीत 'भरली वालपापडी', चपाती-भाकरीसोबत लागेल भारी 
लाईफस्टाईल

साध्या जेवणाचीही मज्जा वाढेल; घरच्या घरी करा कुरकुरीत 'भरली वालपापडी', चपाती-भाकरीसोबत लागेल भारी

रोजच्या जेवणात थोडा वेगळा आणि खमंग स्वाद आणायचा असेल तर भरली वालपापडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. घरगुती मसाल्याने भरलेली आणि हलक्या तेलात भाजलेली ही कुरकुरीत वालपापडी चपाती, भाकरी किंवा वरण-भातासोबत खायला अप्रतिम लागते. कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी ही पारंपरिक रेसिपी एकदा नक्की करून पाहा.

Mayuri Gawade

दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात रोजची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर वालपापडीपासून बनणारी खमंग भरली वालपापडी हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. मसाल्याने भरलेली आणि हलक्या तेलात भाजलेली ही कुरकुरीत भाजी साध्या चपाती, भाकरी किंवा वरण-भातासोबतही अप्रतिम लागते. घरगुती मसाल्याचा सुगंध आणि वालपापडीचा खास स्वाद यामुळे हा पारंपरिक पदार्थ जेवणाच्या ताटात वेगळीच चव आणतो.

कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पाहुणे आले असतील किंवा रोजच्या जेवणात थोडा बदल करायचा असेल, तर खमंग भरली वालपापडी नक्की करून पाहण्यासारखी आहे.

साहित्य

  • वालपापडी - पाव किलो

  • बेसन - २ ते ३ टेबलस्पून

  • तांदुळाचे पीठ - १ टेबलस्पून

  • धणेपूड - ½ टेबलस्पून

  • जिरेपूड - ½ टेबलस्पून

  • हळद - ½ टेबलस्पून

  • लाल तिखट - ½ टेबलस्पून

  • हिंग - चिमूटभर

  • कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

  • लिंबाचा रस - ३ ते ४ टेबलस्पून

  • मीठ – चवीनुसार

  • वालपापडीतील दाणे - १ ते २ टेबलस्पून (बारीक चिरलेले)

  • पाणी - गरजेनुसार

  • तेल - भाजण्यासाठी

कृती

सर्वप्रथम वालपापडीच्या शेंगा स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवून घ्या. त्यानंतर प्रत्येक शेंग मधोमध हलक्या हाताने उघडून त्यातील धागे काढा आणि काही दाणे वेगळे काढून ठेवा.

आता एका भांड्यात बेसन, तांदुळाचे पीठ, धणेपूड, जिरेपूड, हळद, लाल तिखट, हिंग, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घाला. त्यात चिरलेले वालपापडीचे दाणेही घालून थोडे पाणी टाकत घट्टसर पेस्ट तयार करा. ही तयार पेस्ट प्रत्येक उघडलेल्या वालपापडीच्या शेंगांमध्ये हलक्या हाताने भरून घ्या.

यानंतर कढईत थोडे तेल गरम करून त्यात मसाला भरलेल्या वालपापडीच्या शेंगा ठेवा. मंद आचेवर त्या दोन्ही बाजूंनी छान खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. तयार आहे खमंग भरली वालपापडी!!!

मसाल्याचा सुगंध आणि कुरकुरीत पोत असलेली ही भरली वालपापडी गरमागरम वरण-भात, चपाती किंवा भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते. घरगुती जेवणात थोडा वेगळा स्वाद आणायचा असेल तर ही पारंपरिक रेसिपी नक्की करून पाहा.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड