आजकालच्या बदलत्या लाईफस्टाईलमुळे सामान्य जीवन खूपच धावपळीचं झालं आहे. अशात अनेकदा लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. खाण्याच्या वेळा बदलतात, काहींना तर नीट बसून जेवायलाही वेळ मिळत नाही. शरीराला योग्य आणि सकस आहार न मिळाल्यास रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. म्हणूनच तुमच्या आहारात काही सुपरफूड्सचा समावेश करणे गरजेचे आहे. हे फक्त शरीराला ऊर्जा देणार नाहीत, तर रक्तवाहिन्याही निरोगी ठेवतील.
१. ओट्स - हृदयासाठी सर्वोत्तम नाश्ता
व्यस्त जीवनशैलीत पटकन तयार होणारा पौष्टिक नाश्ता हवा असेल तर ओट्स हा सर्वात चांगला पर्याय आहे. यात प्रथिने, फायबर आणि कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. विशेष म्हणजे यात असलेलं बीटा ग्लूकल सॉल्यूबल फायबर रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करतं. नियमित सेवनाने रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक जमा होत नाही आणि रक्तप्रवाह सुधारतो. ओट्स पोट भरलेले ठेवतात, पचन सुधारतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
२. मोरिंगा - रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणारा सुपरफूड
मोरिंगा म्हणजेच शेवग्याची पानं रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यात अँटीऑक्सिडंट्ससह विटॅमिन्स आणि बायोअॅक्टिव्ह कंपाऊंड्स असतात, जे सूज कमी करून रक्तवाहिन्यांची लवचीकता वाढवतात. त्यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रित राहतात. मोरिंगा पावडर तुम्ही स्मूदी, चहा किंवा सूपमध्ये घालून दररोज घेऊ शकता. नियमित सेवनाने हृदयासंबंधी आजारांची शक्यता कमी होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.
३. अक्रोड - रक्तवाहिन्यांसाठी पोषक ड्रायफ्रूट
अक्रोड हे मेंदू आणि हृदय दोन्हींसाठी उत्तम ड्रायफ्रूट मानले जाते. यात असलेलं ओमेगा ३ ॲसिड रक्तवाहिन्यांची लवचीकता वाढवतं आणि सूज कमी करतं. यामुळे रक्तात गुठळ्या तयार होण्याची शक्यता कमी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो. दररोज काही भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने पचन सुधारतं आणि शरीराला आवश्यक खनिजे मिळतात. मात्र मीठ किंवा मसाले लावलेले अक्रोड खाणं टाळा.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)